‘चाय पे चर्चा’ करणारे सरकार चहावाल्यांची चर्चा कधी करणार?*
स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना
सकाळचा पहिला घोट असो, मित्रांची जमलेली मैफल असो वा राजकीय गप्पांची शेकोटी—आपल्या प्रत्येकाचा दिवस चहाच्या कपानेच सुरू होतो. एकेकाळी याच *‘चाय पे चर्चा’* ने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आणि चहावाला हा शब्द एका मोठ्या राजकीय क्रांतीचे प्रतीक बनला. पण आज त्याच चहाच्या टपरीवर उभा असलेला सामान्य चहाविक्रेता महागाईच्या आगीत होरपळतो आहे.
दूध, साखर, चहापत्ती, गॅस सिलिंडर, दुकानाचे भाडे आणि कामगारांचे पगार—सगळ्यांचेच भाव गगनाला भिडले आहेत. पण चहाच्या कपाची किंमत मात्र तिथेच खिळून आहे. चहावाल्याने चहाचे भाव एक-दोन रुपयांनी वाढवले, तर ग्राहक लगेच तोंड उघडतो. पण "माझा रोजचा खर्च किती वाढलाय?" या त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मात्र कोणीच पुढे येत नाही.
हा केवळ पाच-दहा रुपयांच्या चहाचा विषय नाही; तर त्या छोट्या कपावर अवलंबून असलेल्या एका गरीब कुटुंबाच्या संसाराचा प्रश्न आहे. मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी आणि सवलती मिळतात, पण छोट्या व्यापाऱ्याने जगायचे कसे? भाडे आणि साहित्य महागले म्हणून तो व्यवसाय बंदही करू शकत नाही आणि भाव वाढवून ग्राहक घालवू शकत नाही.
महागाईच्या या चक्रव्यूहात चहा पिणारा ग्राहकही त्रस्त आहे आणि विकणारा चहावालाही. फरक एवढाच की, दोघेही मूग गिळून गप्प आहेत.
आज प्रश्न सोपा पण गंभीर आहे—ज्या चहाच्या कपाने राजकारणाला अभूतपूर्व उंची दिली, त्या कपात उकळणाऱ्या एका सामान्य माणसाच्या वेदनेची चर्चा ही सत्ताधारी आणि समाज कधी करणार

