नाशिकमध्ये ‘ती’ अबला न्यायासाठी फिरतेय अनवाणी

नाशिकमध्ये ‘ती’ अबला न्यायासाठी फिरतेय अनवाणी

(प्रशांत बाफना विभागीय संपादक 8055440385)

नाशिक मधील एका घटनेने अंधश्रद्धेच्या कहर किती झाला आहे हे सिद्ध होऊ लागले आहे. पोलिस अन् समाज दोघांनी संयुक्तपणे कठोर प्रतिकार केला, तर अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकेल. अन्यथा अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकांगी लढा किती दिवस देऊ शकेल? शेकडो भोंदू बाबा आजही नाशिक मध्ये कार्यरत आहे. एक खरात बाबा पकडला गेला, याचा अर्थ अंधश्रद्धेला प्रतिबंध बसला असे होत नाही. तर समाजात चोहोबाजूने अशा घटना वारंवार होत आहे. अंधश्रद्धा ही केवळ एखाद्या चुकीच्या समजुतीचे नाव नाही. ती प्रश्न विचारण्याची क्षमता संपवणारी सामाजिक मानसिकता आहे. भीती, अज्ञान आणि असहायतेचा फायदा घेऊन काही भोंदू लोक चमत्कार, ग्रहदोष, तंत्र-मंत्र, भूतबाधा आणि तथाकथित दैवी शक्तींच्या नावाखाली सामान्यांची आर्थिक व मानसिक लूट करतात. नाशिक मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहे परंतु त्यांनाही आता मर्यादा येऊ लागल्या आहेत.

आज विज्ञानाने असाध्य वाटणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय शोधले आहेत; तरीही आजारावर डॉक्टरांऐवजी मांत्रिक, संकटावर कष्टाऐवजी अंगारे-धुपारे आणि भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नांऐवजी कुंडलीचा आधार घेतला जातो. ही श्रद्धा नसून विवेकाचा पराभव आहे. श्रद्धा वैयक्तिक असू शकते; परंतु अंधश्रद्धेमुळे जीविताला धोका निर्माण होत असेल, आर्थिक फसवणूक होत असेल किंवा एखाद्याचे शोषण होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे ही सामाजिक जबाबदारी आहे. समाजाला चमत्कारांची नव्हे, प्रश्न विचारणाऱ्या बुद्धीची गरज आहे. देवाच्या नावावर भीती पसरवणाऱ्यांना प्रश्न विचारा, दाव्यांचा पुरावा मागा आणि प्रत्येक गोष्टीकडे विवेकाच्या कसोटीने पाहा. अंधश्रद्धा माणसाला गुलाम बनवते. विज्ञान आणि विवेक त्याला मुक्त करतात. चमत्कारावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचा पुरावा मागीतला पाहीजे. कारण प्रश्न विचारणारा समाजच प्रगती करतो. सध्या नाशिकमध्ये अशाच एका प्रकरणाने कहर केला आहे. ती माहिती जाणून घेणे गरजेचे वाटते. नाशिकच्या घटनेतील महिलेचे नाव कमलाबेन आहे. ती आहे साधारण तिशीतील. गुजरातमधील बलसाड येथील रहिवाशी. अत्यंत गरीब परिस्थितीतील असून ती मोलमजुरी करून पोट भरते.

चार वर्षांपूर्वी तिची नाशिक येथील फुलेनगरच्या एका तरुण मुलाशी ओळख झाली. नंतर त्यांचे प्रेम जमले. तिचा प्रियकर नाशिकमध्ये मजुरीचे काम करतो. बलसाडला ते चार वर्षे लिव इन रिलेशन मध्ये राहिले. आज लग्न करतो, उद्या करतो अशा भूलथापा मारून त्याने चार वर्षांपासून तिला आशेवर ठेवले व शेवटी लग्नाला नकार दिला. तो पुढे नाशिक येथे राहू लागला. त्या दरम्यान त्याची नाशिक येथील तथाकथित आध्यात्मिक गुरु असलेल्या एका भोंदूबाबाची व कमलाबेनशी ओळख झालेली होती. अघोरी पूजाविधी केला तर तुम्हा दोघांचे लग्न लागेल, असे त्या भोंदूने तिला सांगितले. त्यासाठी त्याने नाशिकला तिला बोलावून अमावास्येच्या रात्री स्मशानात अघोरी पूजाविधी केला. त्याबदल्यात तिच्याकडून वेळोवेळी त्र्याऐंशी हजार रुपये उकळले. त्याबद्दलचा तिच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. तिची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यासाठी तिने तिच्या आईचे सर्व दागिने विकले. तिने अनेकांकडून उसनवारी केली. पण एवढा खर्च करूनही भोंदूबाबाचा गुण आला नाही. त्याचा जाब तिने भोंदूबाबाला विचारला असता आपल्या दैवी सामर्थ्याने तुला मारून टाकू, असे त्याने धमकावले.

दरम्यान तिचा प्रियकर हा याच भोंदूबाबाचा चेला झाला. दोघे लक्ष्मीबेनच्या विरोधात गेले. आपल्याला न्याय मिळावा म्हणून ती एकटी नाशिकला आली. प्रियकराने लग्न तर दूरच उलट तिला मारहाण केली. तिने पोलीस ठाणे गाठले. साधी तक्रार केली असता तिला फारसा चांगला अनुभव आला नाही. आपण दोन वर्षांनी लग्न करू असे पोलिसांसमोर खोटे बोलून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. पोलीस ठाण्याच्या परिसरात ती रडत असल्याचे आणि हा अंधश्रद्धेबद्दलचा विषय असल्याचे पाहून एका पत्रकाराने तिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपर्क क्रमांक दिला. तिच्याशी बोलणे झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तिची भेट घेतली. तेव्हा तिच्या एका हातात गुजराथी भाषेतील अक्षरे लिहिलेली प्लास्टिकची पिशवी तर दुसऱ्या हातात विषाची बाटली आढळली. अधिक चौकशी करता तिने रडतरडतच सांगितले की, मला कुणाचाच आधार नाही, मला न्याय पाहिजे पण कुणीही मदत करत नाही. म्हणून मी आता विष घेणार आहे. कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्याकडून बाटली हिसकावून घेतली.तिचे समुपदेशन केले व हळूहळू तिला आत्महत्येपासून परावृत्त केले व तिला पंचवटी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. गुन्हा नोंद करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने पोलिसांना निवेदन दिले. पोलिस ठाण्याच्या बाहेर झाडाखाली उभे असतांना तिथे लाल मुंग्या तिच्या पायाला चावल्या कारण ती अनवाणी होती.

कारण विचारले असता जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत चप्पल घालणार नाही, अशी तिने शपथ घेतल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी आम्ही सोबत असल्याचे तिला आश्वस्त करून तिला चप्पल घेऊन दिली. ती नाशिकमधील फुलेनगर मध्ये एका नातेवाईककडे तात्पुरत्या स्वरूपात राहत आहे. नातेवाईकाची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने व त्यांना भार नको म्हणून ती एक वेळ उपाशी राहते. तिने पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार केली हे समजले असता तिचा प्रियकर व भोंदूबाबाने तिला फोनवर धमकी दिली व शिवीगाळ केली. तिच्याकडून जबरदस्तीने सावकारी पद्धतीने पैसे दिले असल्याचे लिहून घेण्याचा व तसे नोटरी करण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी तो उधळून लावला. त्यांनी मग तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली.

एवढेच नाही तर रात्री त्या दोघांनी तिच्या नातेवाईकाचे घर गाठले. त्यांच्या हातातील सुरा पाहून प्रचंड घाबरून तिने पळ काढला. कार्यकर्त्यांनी पोलिसांशी बोलून तिला पोलीस ठाण्यात पाठविले. पण तिला काही मदत झाली नाही. कसातरी तिने एका मंदिराचा आडोसा शोधला. रात्रभर तिने तिथेच मुक्काम केला. सकाळी उठून तिने कार्यकर्त्यांना हे सांगितले. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते तिच्या राहण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी तिला मदत करीत आहेत. तिच्या राहण्याची नाशिकमध्ये अशी तात्पुरती काही दिवसांसाठी सोय करण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. पण आता उर्वरित जबाबदारी पोलिसांनी आणि समाजाने घेतली पाहिजे, तरच कमलाबेनला न्याय मिळेल 
Previous Post Next Post