नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवानिमित्त मानमोडीत अभिनव उपक्रम.महत्त्वाचे कागदपत्र जतन करण्यासाठी 'फोल्डर फाइल्स'चे मोफत वितरण.

नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवानिमित्त मानमोडीत अभिनव उपक्रम.

महत्त्वाचे कागदपत्र जतन करण्यासाठी 'फोल्डर फाइल्स'चे मोफत वितरण.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२९ 
महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा लोकप्रिय लोकनेते एकनाथराव खडसे उर्फ नाथाभाऊ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘नाबाद ७५’ अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील मानमोडी येथे एक आगळावेगळा व समाजोपयोगी उपक्रम म्हणजे प्रत्येक घरात महत्त्वाच्या कागदपत्रांच्या जतनासाठी ५०० आकर्षक ‘फोल्डर फाईल’चे मोफत वितरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील पदाधिकारी,कार्यकर्ते आबा पाटील सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

लोकनेते नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवानिमित्त मानमोडी गावातील प्रत्येक घरापर्यंत सुंदर, आकर्षक व प्लास्टिक कोटेड चेनयुक्त ‘फोल्डर फाईल’ मोफत पोहोचविण्याचा संकल्प गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून,या उपक्रमांतर्गत ५०० फोल्डर फाईलचे वितरण करण्यात येत आहे.
“एक छोटासा उपक्रम... आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन!”आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक कुटुंबाकडे अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. ही कागदपत्रे सुरक्षित ठेवणे, एकाच ठिकाणी जतन करणे आणि वेळेवर सहज उपलब्ध होणे, ही प्रत्येकाची गरज आहे. हीच गरज ओळखून मानमोडी येथील कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक खर्च न करता नागरिकांच्या दैनंदिन उपयोगी पडणारा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या फोल्डर फाईलमध्ये जन्म दाखले,शाळेचे दाखले, आधारकार्ड,पॅन कार्ड,रेशन कार्ड, एटीएम कार्ड,बांधकाम कामगार कार्ड,आयुष्मान कार्ड, ७/१२ उतारे,विविध नोंदी,जातीचे दाखले, वारस दाखले, घर व वाहनासंबंधीची कागदपत्रे, शेतजमिनीचे दस्तऐवज, बँक पासबुक, दुर्मिळ छायाचित्रे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे जतन करता येणार आहेत.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त हा उपक्रम केवळ एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसून लहान मुले, विद्यार्थी, युवक, महिला, पुरुष, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अनेकदा आवश्यक कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्याने ती शोधताना अडचणी निर्माण होतात किंवा कालांतराने खराब होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षित आणि व्यवस्थित राहावीत, हा या उपक्रमामागील प्रमुख व प्रामाणिक उद्देश आहे.
“पुढील ७५ वर्षेही कागदपत्रे सुरक्षित राहावीत”

लोकनेते नाथाभाऊंच्या ‘नाबाद ७५’ या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामागे एक सुंदर संदेशही देण्यात आला आहे.नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहावीत, ती सहज शोधता यावीत आणि पुढील अनेक वर्षे त्यांचे योग्य जतन व्हावे,या उद्देशाने या फोल्डर फाईलचे वितरण करण्यात येत आहे.
“हा छोटासा उपक्रम म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे,” अशी भावना मानमोडी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
४० वर्षांच्या जनसेवेचा गौरव
लोकनेते एकनाथराव खडसे उर्फ नाथाभाऊ यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकिर्दीत सुमारे चार दशकांहून अधिक काळ जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक आणि वंचित घटकांचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून ते तडीस नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

नाथाभाऊंच्या या दीर्घ जनसेवेचा सन्मान म्हणून त्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात मानमोडी येथील कार्यकर्त्यांनी हार-तुरे, दिखाऊ खर्च किंवा केवळ औपचारिक कार्यक्रमांपेक्षा सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष उपयोगी पडणारा उपक्रम निवडल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

ग्रामदेवतेच्या चरणी निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना
लोकनेते नाथाभाऊ यांना उदंड, निरामय व आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभावे, त्यांनी पुढील काळातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहावे, अशी मंगल कामना मानमोडीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मानमोडी गावातील ग्रामदेवता आई मरी आईच्या चरणी नाथाभाऊंच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.
“लोकनेते नाथाभाऊंचे नाबाद ७५... आणि जनसेवेचा हा प्रवास असाच अविरत सुरू राहो,” अशा शुभेच्छांसह मानमोडीतील समस्त गावकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा समाजोपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे.
Previous Post Next Post