पातूरच्या जैन मंदिरात धाडसी चोरी; पोलिसांच्या रात्रगस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह!
दोन तोळे सोन्याचा मुकुट ,व इतर साहित्य सह दानपेटीतील रोकड लंपास; तीन महिन्यांत सात-आठ चोरी-घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना
पातुर अकोला तालुका प्रतिनिधी
पातूर : पातूर शहरातील खानापूर रोडवरील जैन मंदिराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून दोन तोळे सोन्याचा मुकुट तसेच दानपेटीतील रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. धार्मिक स्थळातच चोरट्यांनी हात साफ केल्याने शहरात खळबळ उडाली असून, पातूर पोलिसांच्या रात्रगस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत पातूर शहरात चोरी व घरफोडीच्या सात ते आठ घटना घडल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या घटनांपैकी किती गुन्ह्यांचा ठोस तपास झाला, किती आरोपी निष्पन्न झाले आणि किती मुद्देमाल हस्तगत झाला, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. अलीकडेच पातूर शहरात भरदिवसा बंद घरांचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटनाही समोर आली होती.
गणेशोत्सवात अतिरिक्त बंदोबस्त, तरी मंदिरात चोरी!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात होमगार्ड तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही खानापूर रोडवरील जैन मंदिरात चोरी होणे ही पोलिसांच्या बंदोबस्त व्यवस्थेची कार्यक्षमता तपासण्याची वेळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बंदोबस्त नेमका कुठे आहे? रात्रगस्तीचे नियोजन प्रत्यक्षात कितपत होते? पोलिसांची वाहने रात्री शहरातील संवेदनशील भागातून फिरतात का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
२७ चेकपोस्ट आणि स्कॅनर नेमके कशासाठी?
पातूर शहरात २७ चेकपोस्टवर स्कॅनर लावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या चेकपोस्टवर पोलिसांकडून नियमित भेटी, तपासणी आणि प्रभावी निगराणी होत नसेल तर ही यंत्रणा केवळ कागदोपत्रीच राहणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चोरी करून चोरटे शहराबाहेर पसार होत असतील तर शहराच्या प्रवेश-निर्गमन मार्गांवरील चेकपोस्टचा उपयोग काय? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली आहे का?
एका पाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असताना नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घरफोडी, मोबाईल चोरी, भंगार दुकानातील चोरी आणि आता थेट मंदिरातील चोरी—घटनांची मालिका सुरू असताना पोलिसांच्या तपासाची आणि प्रतिबंधात्मक कारवाईची दिशा नेमकी काय आहे? हा प्रश्न आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
मंदिरासारख्या धार्मिक स्थळालाही चोरट्यांनी लक्ष्य करण्याचे धाडस केले असेल, तर कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पातूरकडे लक्ष देण्याची मागणी
चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पातूर शहरातील रात्रगस्ती, चेकपोस्ट, सीसीटीव्ही यंत्रणा आणि प्रलंबित चोरीच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र आढावा घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चोरी करणारे मोकाट आणि नागरिक भयभीत, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. जैन मंदिरातील चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करणे आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे, हे आता पातूर पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

