सगरोळी येथे केदारेश्वर महादेव मंदिरात नवनाथ पोथी समाप्ती सोहळा उत्साहात
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :सगरोळी (ता. बिलोली) : श्री केदारेश्वर महादेव मंदिर, सगरोळी येथे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य नवनाथ पोथी समाप्ती सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. श्री सद्गुरु ष. भ्र. ब्र. १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० ते ११ या वेळेत श्री. शि. भ. प. शंकरआप्पा महाराज उदगीरे यांच्या उपस्थितीत नवनाथ पोथी समाप्ती करण्यात आली. त्यानंतर ह. भ. प. मुकुंद महाराज यांचे प्रवचन झाले. दुपारी १२ वाजता श्री सद्गुरु ष. भ्र. ब्र. १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुदेकर यांचे आशीर्वचन झाले. या धार्मिक कार्यक्रमास गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर दुपारी १ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचे दाते श्री. गंगाधर रामलू शक्करवार यांच्या तर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
सामाजिक व धार्मिक कार्य करणाऱ्या मंडळांचा गौरव
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सगरोळी गावातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणाऱ्या मंडळे व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
बाहेरील तालुक्यांमध्ये जाऊन दहीहंडी स्पर्धेत सहभागी होत पाच ठिकाणी विजय मिळविणाऱ्या सिद्धेश्वर दहीहंडी पथकाचा विशेष गौरव करण्यात आला.
तसेच श्री हनुमान सेवा गणेश मंडळाच्या वतीने हनुमान मंदिर येथे दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या भंडाऱ्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवाभावी कार्याबद्दल मंडळाचा सत्कार करण्यात आला.
वीरभद्र बाल गणेश मंडळ, महाजन गल्ली यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याबद्दल मंडळाचा गौरव करण्यात आला. नवयुवक गणेश मंडळाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
श्रावण महिन्यात दररोज श्री केदारेश्वर महादेव मंदिरात भक्तिमय भजनाची सेवा देणाऱ्या केदारेश्वर भजनी मंडळाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच मंदिर परिसरात शिवपाठाचे आयोजन करून धार्मिक वातावरण निर्मितीत योगदान देणाऱ्या महिला मंडळींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
गावातील विविध मंडळे, युवक व महिला यांच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम सुरू असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री केदारेश्वर महादेव मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळी, सगरोळी यांनी परिश्रम घेतले. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याने गावात आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

