चमत्कारामागचे सत्य उलगडले; केसराळी येथे अंधश्रद्धेविरोधी जनजागृती

चमत्कारामागचे सत्य उलगडले; केसराळी येथे अंधश्रद्धेविरोधी जनजागृती

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्तीबरोबरच विवेक, विज्ञान आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देत ‘केसराळीचा राजा नवयुवक सार्वजनिक बाल गणेश मंडळा’समोर अंधश्रद्धा निर्मूलनाचा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह कमलाकर जमदडे यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करून त्यांच्या मागील वैज्ञानिक कारणांचा उलगडा केला.
कार्यक्रमाची सुरुवात सायलू कारमोड यांच्या आवाजातील “शूर गडी तू, वीर गडी तू, कोण्या कोण्या शक्तीला घाबरतोस तू रे, घाबरतोस तू...” या वैज्ञानिक संदेश देणाऱ्या गीताने झाली. अंधश्रद्धा आणि भीतीवर भाष्य करणाऱ्या या गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्षितिजा जमदडे आणि ऋतुजा जमदडे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
यानंतर कमलाकर जमदडे यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. प्रयोग सुरू असताना अनेकांना हे प्रकार खरोखरच चमत्कार किंवा दैवी शक्तीचे परिणाम असल्याचा भास झाला. मात्र प्रयोग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रयोगामागील तंत्र, वैज्ञानिक तत्त्वे, हातचलाखी, निरीक्षण आणि मानसशास्त्रीय परिणाम यांचे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले.
चमत्काराचा भास निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर त्याच विश्वासाचा गैरफायदा घेणे, अशा पद्धतीने भोंदूगिरी केली जाऊ शकते, हे जमदडे यांनी प्रयोगांच्या माध्यमातून स्पष्ट केले. केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास न ठेवता त्यामागील कारण शोधण्याची सवय लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा अर्थ श्रद्धा किंवा धर्माला विरोध करणे नसून, श्रद्धेच्या नावावर होणारी फसवणूक, भीती निर्माण करणे, चमत्कारांचे दावे, चुकीचे उपचार आणि अंधानुकरण यापासून समाजाला सावध करणे हा असल्याचे जमदडे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील लिंबू-मिरची, करणी, भूतबाधा, दैवी शक्ती आणि आजारपणाशी संबंधित विविध गैरसमजांची उदाहरणे देत त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारण्याची आणि पुराव्याच्या आधारे विचार करण्याची भूमिका स्वीकारण्याचे आवाहन केले.
“कुठलीही गोष्ट ऐकली किंवा पाहिली म्हणून लगेच खरी मानू नका. त्यामागे कारण काय आहे, पुरावा काय आहे, हे तपासा,” असा संदेश त्यांनी दिला. आजारपणाच्या वेळी भोंदू व्यक्तींच्या दाव्यांवर अवलंबून न राहता योग्य वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता समाजप्रबोधनाचा माध्यम बनू शकतो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमासाठी भीमराव बडूरकर, सायलू कारमोड, क्षितिजा जमदडे आणि ऋतुजा जमदडे यांनी सहकार्य केले. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक आणि गणेशभक्तांची उपस्थिती लाभली.
वैज्ञानिक गीत, प्रत्यक्ष प्रयोग आणि त्यामागील सत्याचा उलगडा यामुळे केसराळी येथील कार्यक्रमातून ‘चमत्कारावर विश्वास ठेवण्यापेक्षा कारण शोधा आणि पुराव्यावर विश्वास ठेवा’ हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
Previous Post Next Post