*कामडी चौकात ८० वर्षांची तान्हा पोळ्याची परंपरा कायम...** जय बजरंग दुर्गा पूजा मंडळाचा उपक्रम; पावसातही बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

*कामडी चौकात ८० वर्षांची तान्हा पोळ्याची परंपरा कायम...*

* जय बजरंग दुर्गा पूजा मंडळाचा उपक्रम; पावसातही बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

देवळी तालुका प्रतिनिधी:-
(रविंद्र पारीसे)
           शहरातील पारंपरिक कामडी चौक येथे गेल्या ८० वर्षांपासून सुरू असलेली तान्हा पोळ्याची परंपरा यंदाही जय बजरंग दुर्गा पूजा मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. बालकांनी सजविलेल्या नंदींसह तान्हा पोळ्यात सहभाग घेतला. यावेळी नंदी दर्शन व आकर्षक सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते.
         कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक बालकाला मंडळाच्या वतीने पाण्याची बाटली देण्यात आली. ‘अ’ गटातील नंदी पाहणी व सजावटीसाठी ५ बक्षिसे, तर ‘ब’ गटासाठी ईश्वर चिठ्ठीद्वारे ११ बक्षिसे देण्यात आली. बक्षिसांमुळे बालकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
        कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाची पर्वा न करता बालकांसह नागरिकांनी तान्हा पोळ्याचा उत्साह कायम ठेवत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या उपक्रमातून पारंपरिक सण-उत्सवांची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
         तान्हा पोळ्याच्या या कार्यक्रमाला पत्रकार रविंद्र पारीसे, उमेश सुरकार, गिरीश कामडी, गजानन फटिंग, राजू मातकर, विनोद कामडी यांच्यासह परिसरातील बालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post