धर्माबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
(धर्माबाद नांदेड तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)
महिन्यापासून पावसाने दडी मारल्या मुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून, शेतातील पिके पार वाळून गेली आहेत. त्यामुळे तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी 'जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती, नांदेड'च्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. या बिकट परिस्थितीत
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भक्कम दिलासा देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २ लाख रुपयांची मदत द्यावी. १०० टक्के पीकविमा वाटप करण्याचे निर्देश विमा कंपन्यांना द्यावेत तसेच पीकविमा योजनेत
आवश्यक चार ट्रिगर्सचा समावेश करावा. आगामी रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करावी. सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांतील प्रलंबित खरीप पीकविम्याची रक्कम त्वरित वितरित करावी. पोचमपाड बॅकवॉटर प्रश्नाबाबत मुंबईत मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करावी. बाभळी
बंधाऱ्याचा थकीत मोबदला (म ावेजा) त्वरित वितरित करावा आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान द्यावे. शेतकरी सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटातून जात असून शासन व प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने नोंद घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनावर शेतकरी नेते डॉ. भगवानराव मनूरकर, नारायण पवार, व्यंकटराव जाधव, बालाजी सावळे, साईनाथ जाधव यांच्यासह धर्माबाद येथील 'शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती'च्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

