देऊळगावात अवैध वरली-मटका व गावठी दारूचा सुळसुळाट.सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा..

देऊळगावात अवैध वरली-मटका व गावठी दारूचा सुळसुळाट.
सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा..

(अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी )


पातूर : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध वरली-मटका तसेच गावठी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन गावातील कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील सार्वजनिक रस्त्यावरच वरली-मटक्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांची ये-जा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराचा विपरीत परिणाम शाळकरी मुलांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या गैरप्रकारामुळे काही विद्यार्थी शाळेकडे जाण्याऐवजी अशा ठिकाणी आकर्षित होण्याची शक्यता असल्याने पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
युवकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती
वरली-मटक्याच्या नादाला लागल्याने अनेक युवक आर्थिक अडचणीत सापडत असून, कुटुंबातील पैशांचा अपव्यय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अल्पावधीत पैसे मिळविण्याच्या आशेने तरुण या प्रकाराकडे वळत असून, त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर, रोजगारावर आणि कौटुंबिक जीवनावर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
गावठी दारूमुळे कौटुंबिक वाद
देऊळगाव परिसरात गावठी दारूची विक्रीही सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दारूच्या व्यसनामुळे काही युवक व नागरिक व्यसनाधीन होत असून, त्यातून घरगुती वाद, आर्थिक अडचणी आणि सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कारवाईची ग्रामस्थांची मागणी
अवैध वरली-मटका आणि गावठी दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस व संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी देऊळगावातील ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शाळकरी विद्यार्थी व युवकांना या गैरप्रकारांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई केली नाही, तर देऊळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि अवैध प्रकारांवर कोणती कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मीडिया पोलीस टाईम✍️
अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी
✍️संतोष उपर्वट✍️
Previous Post Next Post