*शिवणी खून प्रकरण: अकोला पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार होण्याच्या बेतात असलेल्या ४ आरोपींना २ तासांत बेड्या*

*शिवणी खून प्रकरण: अकोला पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार होण्याच्या बेतात असलेल्या ४ आरोपींना २ तासांत बेड्या* 

(अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान)


अकोला:शिवणी येथील क्रांतीनगर भागात जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या २ तासांत सर्वच्या सर्व ४ आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. सैय्यद फैजान सैय्यद रफीक (वय २२, रा. किसान नगर, शिवणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जुन्या वादातून थरार
फिर्यादी उजेफखान नझीरखान (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर रोजी क्रांतीनगर भागात जुन्या वादावरून आरोपींनी त्यांच्याशी व त्यांच्या भावाशी वाद घातला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपींनी सैय्यद फैजान याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या फैजानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रेल्वे स्टेशनवरून आवळल्या मुसक्या
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि एमआयडीसीचे ठाणेदार विजय जाधव यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तात्काळ एलसीबीची ५ आणि एमआयडीसीची २ अशी एकूण ७ पथके तयार केली.
यातील एक आरोपी सत्यम उर्फ गोलू गवई हा देखील हाणामारीत जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरित तीन आरोपी शिवणी रेल्वे स्टेशन परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच पळ काढणाऱ्या तिन्ही आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना २ तासांच्या आत अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. सत्यम उर्फ गोलू सुरेश गवई (वय २५, रा. क्रांती नगर, शिवणी)
२. अक्षय उर्फ अजय गजानन कंकाळ (वय २३, रा. क्रांतीनगर, शिवणी)
३. आदित्य उर्फ रावण शरद वानखेडे (वय २०, रा. क्रांतीनगर, शिवणी)
४. संतोष गजानन काशीदे (वय ४३, रा. न्यू भीम नगर, शिवणी)
आरोपींनी जुन्या भांडणातूनच हा खून केल्याची कबुली दिली आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि एमआयडीसी पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
Previous Post Next Post