*मेळघाटहून बीडमध्ये आले दुर्मिळ ‘लाँग-बिल्ड व्हल्चर’; सर्पराज्ञीत उपचार सुरू*
...................
(बीड दि. २१ (प्रशांत बाफना) : विभागीय संपादक)
बीड जिल्ह्यात अतिशय दुर्मिळ आणि गंभीरपणे संकटग्रस्त असलेल्या लाँग-बिल्ड व्हल्चर (Gyps indicus) अर्थात भारतीय गिधाडाला जखमी अवस्थेत जीवदान देण्यासाठी वनविभागाच्या मदतीने सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या गिधाडाच्या पायावरील ओळख टॅगमुळे त्याचा मेळघाट ते बीडपर्यंतचा प्रवास उलगडला आहे.
सिरसदेवी-गडी (माजलगाव) मार्गावर हे गिधाड जखमी अवस्थेत आढळून आले. शेतकरी पवार यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शिल्पा ससाने आणि वनरक्षक रामराव सोनकांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गिधाडाला ताब्यात घेतले.
त्यानंतर पुढील उपचार व पुनर्वसनासाठी त्याला तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. केंद्राच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या देखरेखीखाली गिधाडाचे वजन, प्रकृती, शारीरिक स्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद यावर नियमित लक्ष ठेवले जात आहे. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुन्हा योग्य नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.
टॅगमुळे उलगडला मेळघाट ते बीडचा प्रवास
या गिधाडाच्या पायावर M87 आणि Z29 असे ओळख टॅग आढळले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) मधील मनन सिंग महादेव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, Z29 हा नर लाँग-बिल्ड व्हल्चर असून २ जानेवारी २०२६ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून संवर्धन कार्यक्रमांतर्गत मुक्त करण्यात आला होता.
पायावरील हे ओळख टॅग गिधाडांची भ्रमंती, स्थलांतर, अधिवासाचा वापर आणि जगण्याच्या पद्धतींचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मेळघाटमध्ये संवर्धन कार्यक्रमातून मुक्त करण्यात आलेल्या गिधाडाची बीड जिल्ह्यात नोंद होणे ही गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जात आहे.
“पायावरील टॅगमुळे या गिधाडाची ओळख आणि त्याचा मेळघाटपासून बीडपर्यंतचा प्रवास समजण्यास मदत झाली आहे. अशा नोंदी गिधाडांच्या भ्रमंतीचा आणि अधिवास वापराचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.”
— सिद्धार्थ सोनवणे, मानद वन्यजीव रक्षक, बीड
...........
*‘M87’ आणि ‘Z29’ टॅग काय सांगतात?*
या गिधाडाच्या पायावर असलेले M87 आणि Z29 हे ओळख क्रमांक संवर्धन संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अशा टॅगच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष्याची स्वतंत्र ओळख ठेवता येते आणि त्याच्या पुढील हालचालींच्या नोंदी जोडता येतात.
हे गिधाड सामान्य वन्य पक्षी नसून गिधाड संवर्धन व पुनर्स्थापना कार्यक्रमांतर्गत मुक्त करण्यात आलेल्या पक्ष्यांपैकी एक आहे. त्याच्या हालचालींच्या नोंदीमुळे मुक्तीनंतर तो कोणत्या भागात गेला, कोणत्या अधिवासाचा वापर केला आणि त्याची भ्रमंती कशी झाली, याचा अभ्यास करता येतो.
*मेळघाटमध्ये संवर्धन कार्यक्रम*
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) आणि महाराष्ट्र वनविभागाच्या सहकार्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लाँग-बिल्ड व्हल्चरच्या संवर्धनासाठी कार्यक्रम राबविण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, पिंजोर, हरियाणा येथील गिधाड प्रजनन केंद्रात जन्मलेल्या पक्ष्यांना मेळघाटमध्ये आणून काही काळ नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांना ओळख टॅग लावून मुक्त करण्यात आले.
काही पक्ष्यांवर GSM/Satellite ट्रान्समीटर बसविण्यात आल्याने त्यांच्या हालचाली, भ्रमंतीचा मार्ग, अधिवासाचा वापर आणि अन्नशोध याबाबत वैज्ञानिक माहिती मिळविणे शक्य होते.
*९० टक्क्यांहून अधिक घटलेली गिधाडांची संख्या*
लाँग-बिल्ड व्हल्चर (Gyps indicus) ही गंभीरपणे संकटग्रस्त प्रजाती असून IUCN Red List मध्ये Critically Endangered म्हणून तिची नोंद आहे. भारतातील गिधाडांच्या संख्येत गेल्या काही दशकांत मोठी घट झाली आहे.
या घटेमागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे पशुधनाच्या उपचारासाठी वापरले जाणारे डायक्लोफेनाक (Diclofenac) हे औषध. डायक्लोफेनाक दिलेल्या जनावराचा मृतदेह गिधाडांनी खाल्ल्यास त्यांच्या मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे गिधाड संवर्धनासाठी सुरक्षित पशुवैद्यकीय औषधांचा वापर आणि मृत पशुधनाची योग्य विल्हेवाट अत्यंत महत्त्वाची आहे.
गिधाडे मृत प्राण्यांचे अवशेष वेगाने नष्ट करून निसर्गातील स्वच्छता आणि रोगप्रसार नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे गिधाडांचे संरक्षण हे केवळ एका पक्षीप्रजातीचे संवर्धन नसून संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्याशी संबंधित आहे.
मेळघाटमध्ये मुक्त करण्यात आलेला एक लाँग-बिल्ड व्हल्चर आता बीडमध्ये जखमी अवस्थेत सापडल्याने त्याच्या भ्रमंतीची नवी वैज्ञानिक नोंद झाली आहे. उपचारानंतर हे गिधाड पुन्हा आकाशात झेपावण्याची प्रतीक्षा वन्यजीवप्रेमींना आहे

