गणपतीच्या नावाखाली पत्ते खेळाल तर कारवाई,DJलाही पूर्ण बंदी; शिरूर पोलिसांचा कडक इशारा..‘एक गाव, एक गणपती’चा पोलिसांचा संदेश; गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा..

गणपतीच्या नावाखाली पत्ते खेळाल तर कारवाई,DJलाही पूर्ण बंदी; शिरूर पोलिसांचा कडक इशारा..

‘एक गाव, एक गणपती’चा पोलिसांचा संदेश; गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा..

(प्रशांत बाफना | बीड विभागीय संपादक)


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिस प्रशासनाने यंदा कडक भूमिका घेतली असून, उत्सवाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, जुगार अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे यांनी दिला आहे. गणेशोत्सव भक्तिमय, शांततापूर्ण आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्यासाठी गणेश मंडळे, पदाधिकारी तसेच नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस ठाण्यात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित नागरिकांना उत्सवाच्या काळात पाळावयाच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे यांनी गणेशोत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या विविध गैरप्रकारांबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.गणपतीच्या नावाखाली पत्ते खेळू नका’, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी जुगारासारख्या प्रकारांना उत्सवाच्या आडून कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर DJ पूर्णपणे बंद राहणार असून, ध्वनिप्रदूषणासह कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराची पोलिस प्रशासन गांभीर्याने दखल घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंडळांनी नियमांचे पालन करूनच उत्सवाचे आयोजन करावे. मंडप, मिरवणूक, ध्वनी व्यवस्था तसेच इतर बाबींमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षाही पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.गणेश मंडळांनीही उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, जनजागृती आणि विधायक कार्यक्रमांना प्राधान्य देत प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सवाच्या काळात शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचे आवाहन-

गावागावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. गावातील नागरिकांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केल्यास अनावश्यक स्पर्धा टाळता येऊन उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करता येईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.



गावागावांत पोलिसांकडून आढावा-

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शिरूर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे हे शिरूर परिसरातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गणेश मंडळांच्या तयारीचा, उत्सवाच्या नियोजनाचा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन-

गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होईल असे कृत्य करू नये तसेच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे यांनी केले आहे
Previous Post Next Post