जिल्ह्यात पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट, कोण कोण अडकले जाळ्यात, 226 जणांवर केसेस.
1,136 वाहनांची तपासणी; 226 वाहतूक नियमभंगाच्या केसेस..
(अहिल्यानगर । प्रशांत बाफना)
जिल्ह्यातील अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सराईत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाने ऑपरेशन ऑल आऊट राबवत धडक कारवाई केली. शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11 ते शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत जिल्हाभरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 1,136 वाहनांची तपासणी करण्यात आली, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध 226 केसेस दाखल करण्यात आल्या. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 12 चालकांवरही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. फरार आरोपी, पाहिजे आरोपी, हद्दपार केलेले गुन्हेगार, अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे आणि अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या विशेष मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांसह एकूण 57 पोलीस अधिकारी, 207 पोलीस अंमलदार आणि 101 होमगार्ड सहभागी झाले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी, वाहन तपासणी तसेच हॉटेल आणि लॉजिंगची तपासणी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांना आळा घालणे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी विशेष बंदोबस्त आणि तपासणीवर भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑपरेशन ऑल आऊटमधील प्रमुख कारवाई
* 1,136 वाहनांची तपासणी
* 226 वाहतूक नियमभंगाच्या केसेस
* 12 मद्यपान करून वाहन चालविण्याच्या केसेस * 50 हद्दपार आरोपींची तपासणी
* 82 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी
* 255 हॉटेल व लॉजिंगची तपासणी
* 159 सराईत गुन्हेगारांची तपासणी
* 23 अवैध धंद्यांविरुद्ध कारवाया
* 20 फरार आरोपींची अभिलेखावरून नावे कमी * 36 पाहिजे आरोपींची अभिलेखावरून नावे कमी

