रावेर तालुका हादरला! केर्‍हाळ्यात जुन्या वादातून तरुणाचा खून..दारूच्या नशेत दोघांत जोरदार हाणामारी; ग्राईंडर मशीनने मानेवर वार, २५ वर्षीय राजू कापडेचा मृत्यू.

रावेर तालुका हादरला! केर्‍हाळ्यात जुन्या वादातून तरुणाचा खून..

दारूच्या नशेत दोघांत जोरदार हाणामारी; ग्राईंडर मशीनने मानेवर वार, २५ वर्षीय राजू कापडेचा मृत्यू.

रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : रावेर तालुक्यातील केर्‍हाळा येथे दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थरारक खुनाच्या घटनेत झाले. मंगळवारी दुपारी साडेएकच्या सुमारास झालेल्या हाणामारीत ग्राईंडर मशीनने मानेवर वार करण्यात आल्याने राजू रवींद्र कापडे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामसिंग चिंधू भील (वय ७२) याच्यावर संशय असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

दारूच्या नशेत पुन्हा वाद; हाणामारीत जीव गेला

मिळालेल्या माहितीनुसार, केर्‍हाळा येथील इंदिरानगर परिसरात रामसिंग भील हे राहत असून ते मिस्तरी काम करतात. राजू कापडे व रामसिंग भील यांची एकमेकांशी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. यावेळी रामसिंग भील यांनी लोखंडी आसारी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राईंडर मशीनने राजू कापडे यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्याने राजू कापडे जागीच कोसळले. 

ग्रामस्थांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

घटनेनंतर ग्रामस्थांनी संशयित रामसिंग भील याला ताब्यात घेत एका घरात कोंडून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रावेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी राजू कापडे यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. 

रावेर पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली. सहाय्यक निरीक्षक अमूल बच्छाव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत. 

भरदिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेने केर्‍हाळा परिसरासह संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Previous Post Next Post