महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व सामाजिक स्वावलंबन हीच खरी प्रगती – आमदार अमोलदादा जावळे.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल, दि. ६ ऑक्टोबर
सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्यक्ष उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मौजा भालोद, ता. यावल येथे आदिवासी लाभार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने आयोजित या मेळाव्यास आदिवासी बांधव व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोलदादा जावळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमोलदादा जावळे यांनी कुटुंबाच्या तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
महिलांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता व्यवसायाकडे वळावे
आमदार अमोलदादा जावळे म्हणाले की, “कुटुंबाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आदिवासी भागातील महिला बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता विविध उत्पादन, प्रक्रिया उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा फिरता निधी
मेळाव्यात दि. १ जुलै २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा फिरता निधी वितरित करण्यात आला. यावेळी संबंधित बचत गटांना निधी वितरणाबाबत प्रमाणपत्रेही देण्यात आली.
या निधीचा उपयोग महिला बचत गटांनी लघुउद्योग, उत्पादन, प्रक्रिया उद्योग तसेच विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले.
योजनांची माहिती आणि अर्ज स्वीकृतीची सुविधा
मेळाव्यात बचत गटांची स्थापना, बँक लिंकेज, विविध शासकीय योजना, आर्थिक सक्षमीकरण तसेच उद्योग-व्यवसायाच्या संधी याबाबत संबंधित विभागांच्या अधिकारी व प्रतिनिधींनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देतानाच संबंधित योजनांसाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे मेळाव्याच्या ठिकाणीच स्वीकारण्यात आली. प्राप्त अर्जांची नियमानुसार छाननी व कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आरोग्य व महसूल विभागाकडूनही मार्गदर्शन
आरोग्य विभाग व महसूल विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच श्रीमती रेणुका सुमन तडवी यांनी महिला बचत गटांच्या वतीने मनोगत व्यक्त करून महिलांच्या विविध मागण्या व अडचणी मांडल्या.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, यावलच्या तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाईकसरकर, गटविकास अधिकारी श्रीमती मंजुषी गायकवाड यांच्यासह प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण दामाडे, पुरवठा विभागाचे चव्हाण, संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागाचे रावसाहेब खारे, विस्तार अधिकारी सपकाळे, भदाणे,जावेद तडवी, ग्रामपंचायत अधिकारी जनार्दन पाटणकर तसेच आदिवासी विकास निरीक्षक झानेश्वर कुमावत,विश्वास गायकवाड, विकास पाटील, कृष्णा पाटील, विनोद पडळे, प्रवीण भिमटे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका, अंगणवाडी सेविका तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकाच छताखाली योजना, मार्गदर्शन आणि अर्ज स्वीकृती
शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांच्या लाभासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे,अर्ज स्वीकृतीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे, या उद्देशाने आयोजित हा लाभार्थी मेळावा आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.
ठळक मुद्दे - सेवा संकल्प अभियानांतर्गत भालोद येथे आदिवासी लाभार्थी मेळावा- आमदार अमोलदादा जावळे यांच्या हस्ते उद्घाटन.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर.पात्र महिला बचत गटांना प्रत्येकी ₹१० हजार फिरता निधी.शासनाच्या विविध योजनांची एकाच ठिकाणी माहिती- लाभार्थ्यांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे मेळाव्यातच स्वीकारली.आरोग्य व महसूल विभागाकडून योजनांची माहिती.
उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन- विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

