मेंढ्यांची संख्या वाढली कि लोकर उत्पादनात वाढेल...संजय वाघमोडे..
लोकर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि मेंढपाळ चर्चासत्र रांजणीत संपन्न..
ईश्वरपूर जिल्हा प्रतिनिधी
मेंढपाळाच्या समोरील सर्वात मोठी समस्या दिवसेंदिवस चराऊ कुरणे कमी होत असल्याने मेंढ्यांसाठी चारा पाणी आणि सुरक्षित चराई क्षेत्र मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे मेंढपाळ आपल्या मेंढ्या विकुन रोजंदारीवर जावू लागल्याने मेंढ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मेंढ्यांसाठी पुरेशी चराईची व्यवस्था नसेल, तर मेंढीपालन टिकणार कसे? मेंढी पालन टिकले नाही तर लोकर मिळणार नाही. लोकरीचे उत्पादन वाढविण्यासाठी पारंपरिक चराई क्षेत्रांचे संरक्षण व एस ई जेड धर्तीवर मेंढपाळासाठी पुरेशी चराई व्यवस्था निर्माण करून त्यांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या तर मेंढपाळ आणि मेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊ लोकर उत्पादनात वाढ होईल. असे प्रतिपादन यशवंत क्रांती चे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केले. ते महाराष्ट्रातील लोकर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि मेंढपाळ बांधवांना लोकर व्यवसायातून अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर पेस्टोरलिझम, नवी दिल्ली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणी (कवठेमहांकाळ) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे आयोजित ‘मेंढपाळ चर्चासत्रात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. विक्रम साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर पेस्टोरलिझमचे रमेश भट्टी, वीणा सिंग, यश केतकर व नंदिनी जयस्वाल उपस्थित होते.
महामंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन टेकाडे, देवानंद लोदे, यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष मा. संजय वाघमोडे, माणदेशी फाऊंडेशनचे शेळीसखी प्रतिनिधी, मित्रा संस्थेचे प्रतिनिधी, मेंढपाळ आर्मीचे अध्यक्ष व कार्यकर्ते, महुद प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. पोपट कारंडे आणि रांजणी प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. सचिन दडस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. रांजणी प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. सचिन दडस यांनी उपस्थित मान्यवर व मेंढपाळ बांधवांचे स्वागत करून चर्चासत्राची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला महामंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन टेकाडे यांनी मृतप्राय होत चाललेल्या लोकर व्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठीच्या उपाययोजना, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वस्तूंच्या पर्याय म्हणून लोकरीचा वापर कशा प्रकारे वाढविता येईल, याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. सेंटर फॉर पेस्टोरलिझमचे रमेश भट्टी यांनी दैनंदिन जीवनातील लोकरीचे महत्त्व, लोकरीचे विविध फायदे तसेच लोकरीला अधिक चांगला दर्जा व बाजारमूल्य मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर मार्गदर्शन केले. वीणा सिंग यांनी लोकरीचा वापर केवळ जेन व घोंगडीपुरता मर्यादित न ठेवता ऑटोमोबाईल क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये कशा प्रकारे करता येऊ शकतो, याबाबत माहिती दिली. मशीनद्वारे लोकर कातरणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मशीनद्वारे लोकर कातरणीचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण लोकरीबाबत डॉ. सचिन दडस यांनी उपस्थित मेंढपाळांना सविस्तर माहिती दिली.
दुपारच्या सत्रात मेंढपाळ बांधवांच्या सहभागातून लोकर संकलन, विक्री, उपयोग, मूल्यवर्धन आणि व्यवसायातील अडचणी यावर सखोल चर्चा झाली. अंकुश मुढे यांनी ही मेंढपाळाच्या प्रश्नावर भाष्य केले.
डॉ. विक्रम साळवे यांनी महामंडळ हे मेंढपाळ आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करते, असे सांगितले. लोकर कशा पद्धतीने संकलित करता येईल, आगामी लोकर उपयोगिता केंद्रासाठी आवश्यक असलेली लोकर, तसेच या प्रक्रियेतून मेंढपाळ बांधवांना होणारे संभाव्य फायदे याबाबत त्यांनी माहिती दिली. मेंढपाळांच्या लोकर तसेच इतर विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महुद प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. पोपट कारंडे यांनी महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रांच्या माध्यमातून लोकर संकलनासाठी मेंढपाळ बांधवांना कशा प्रकारे सहकार्य करता येईल, याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या पारंपरिक व्यवसायाला नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण ठरले. चर्चासत्रास यशवंत क्रांती चे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, आष्टा शाखाध्यक्ष भिमराव गावडे याच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

