घरकुलासाठी वसारी येथील फासेपारधी बांधवांची मंत्रालयापर्यत वणवण भटकंती.लेखी आश्वासनाचे कागदी घोडे : आत्मदहनाच्या इशार्‍यानंतरही प्रशासन ढिम्म..

घरकुलासाठी वसारी येथील फासेपारधी बांधवांची मंत्रालयापर्यत वणवण भटकंती.

लेखी आश्वासनाचे कागदी घोडे : आत्मदहनाच्या इशार्‍यानंतरही प्रशासन ढिम्म..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकु पवार 

वाशिम - मालेगाव तालुक्यातील वसारी येथील चंद्रमौळी राहणार्‍या फासेपारधी बांधवांची शासन निर्णयानुसार हक्काच्या घरकुलासाठी गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा व मंत्रालयापर्यत धावाधाव व भटकंती सुरु आहे. मात्र दशक उलटल्यानंतरही त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. प्रशासनाकडून लेखी आश्वासनांचे केवळ कागदी घोडे नाचवणे सुरु असून आत्मदहनाच्या इशार्‍यानंतरही शासन व प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची पंचाहत्तरवी पहाट उगवल्यानंतरही या फासेपारधी बांधवांच्या हक्काच्या घरात स्वातंत्र्याचा सुर्य अजुनही उगवलेला नाही.
 याबाबत सौ. उज्वला शंकु पवार व इतर १४ फासेपारधी बांधवांनी २६ सप्टेंबर रोजी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवून आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांच्या मागण्यांमध्ये, १५०० चौ.फुट जागा उपलब्ध करुन मालकी आठ अ उतारा व अडीच लाख रुपयाचे घरकुल मंजूर करावे, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करावी तसेच उदरनिर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, घरकुलाच्या मागणीसाठी ९ जानेवारी २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी मालेगावचे गटविकास अधिकारी यांनी एक महिण्याच्या आत घराचे ८ अ देतो असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांचा दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या भेटीदरम्यान त्यांनी सुद्धा १५ दिवसात काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तरी सुध्दा आजपावेतो जागेचा ८ अ मिळालेला नाही. आम्ही फासेपारधी समाजाचे असुन मौजे वसारी येथील सरकारी गावठाण शेत सर्वे नं. १३८ मधील जमीनीवर कुडामातीचे व ताट्याच्या घरात राहत आहात. यापुर्वी आमच्या पुर्वजांनी सुद्धा वसारी येथील सरपंच, ग्रामसेवक व तहसिलदार यांना सुद्धा लेखी व तोंडी विनंती अर्ज सादर केलेले आहेत. आमच्याकडे सदर जागेचा नमुना १ ई ची नक्कल सन १९९५-९६ चा शासकिय पुरावा, जागेच्या दंडाच्या व कराच्या पावत्या आहेत. मात्र घरकुलाच्या मागणीसंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामीण ग्रुप कार्यक्रमांतर्गत व १६ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. मौजे वसारी येथील गट नं. ६१५, ६१६ व ६१७ मधील पुर्वीचे लोकांची नांवे कमी करुन एक वर्षाआधी सातबारा कोरा झालेल्या गावठाण झालेल्या जमीनीवर सन १९८९ पासुन वास्तवास आहोत. घरकुलाच्या मागगणीसाठी गटविकास अधिकार्‍यांनी आम्हाला खोटा आदेश देवून आमचा मानसिक व आर्थिक छळ केल्याचा आरोप फासेपारधी बांधवांनी निवेदनाव्दारे केला आहे. तरी संबंधीत अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करुन घरकुलाची मागणी पुर्ण करावी अशी मागणी फासेपारधी बांधवांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Previous Post Next Post