नाहाटा महाविद्यालयात मूकनाट्य व प्रहसन कार्यशाळा संपन्न..

नाहाटा महाविद्यालयात मूकनाट्य व प्रहसन कार्यशाळा संपन्न..


(भुसावळ : यावल विभागीय संपादक सुरेश खैरनार)


विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या सर्जनशीलता, अभिनयकौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ‘मूकनाट्य (Mime) व प्रहसन (Skit)’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्थशास्त्र विभागात ही कार्यशाळा पार पडली.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. अनिल कोष्टी हे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील व डॉ. जी. आर. वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले होते.
प्रथम सत्रात अनिल कोष्टी यांनी ‘प्रहसन : संकल्पना, सादरीकरण व मार्गदर्शन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रहसनाची संकल्पना, कथानकाची निवड, अभिनय, विनोदाची परिणामकारक मांडणी तसेच सामाजिक संदेश प्रभावीपणे सादर करण्याच्या विविध पद्धती त्यांनी स्पष्ट केल्या.
द्वितीय सत्रात गोदावरी इंग्लिश स्कूलचे कुंदन तावडे यांनी ‘मूकनाट्य : संकल्पना, तंत्रे व प्रात्यक्षिक’ या विषयावर मार्गदर्शन केले. संवादाचा वापर न करता हावभाव, देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि हालचालींच्या माध्यमातून विचार व भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याचे तंत्र त्यांनी प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यानंतर प्रात्यक्षिक, संवाद व प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करत मूकनाट्य व प्रहसनाच्या सादरीकरणाबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता चौधरी होत्या. विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्जनशील विकासासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना नेमाडे यांनी, तर आभार प्रा. डॉ. सचिन राजपूत यांनी मानले. कार्यशाळेस महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
Previous Post Next Post