नटसम्राट' हरपला!*

*'नटसम्राट' हरपला!*

(प्रशांत बाफना 8055440385 महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)

विश्वनाथ दिनकर पाटील या नावाचा कुणी माणूस होता, यावर विश्वास तरी बसेल का ? परंतु त्याहीपेक्षा या नावाचा माणूसच आम्हाला माहित नाही, असे सहज कुणीही म्हणू शकेल. पण विश्वनाथ दिनकर पाटील म्हणजेच आपले 'नाना पाटेकर' होते, यावर आता विश्वास ठेवावाच लागेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे व दुर्दैव म्हणजे नाना पाटेकर आपल्याला येथून पुढे पुन्हा दिसणार नाही. एक कलाकार म्हणूनच नव्हे, तर 'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा 'नाना' गेला, ही बातमी समस्त शेतकऱ्यांनाही कमालीचे दुःख देऊन गेली. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होणारच. अब तक छपन्न, क्रांतिवीर, परींदा, सिंहासन, तिरंगा, टॅक्सी नं. ९२११ यासारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. सरकारने २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला होता होता. राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना तीनवेळा सन्मानित करण्यात आले होते. दमदार आवाज ही त्यांची खासियत होती व तो दमदार आवाज आता पुन्हा ऐकायला मिळणार याचे कमालीचे दुःख होत आहे!

'नाम' संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करणारा हरहुन्नरी 'नटसम्राट' पुन्हा दिसणार नाही, याचे संपूर्ण देशाला दुःख होत आहे. शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांशी एवढी जवळीक असणारा कलाकार पून्हा कधीही पाहायला मिळणार नाही. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा महाराष्ट्र हळहळला. नानांची गणना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. ‘गमन’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. परंतु ‘अंकुश’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केले आहे. ‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, 'प्रहार' आणि ‘खामोशी’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गंभीर भूमिकांपासून ते विनोदी आणि खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘परिंदा’ मधील गँगस्टरच्या भूमिकेने त्यांना सुपरहिट केले. काही चित्रपटांतून त्यांनी आपली ‘ॲक्शन-ओरिएंटेड’ अभिनेता म्हणून छाप पाडली. 'साला एक मच्छर, आदमी को' या डायलॉगबाजीने नाना घराघरात पोहोचले. नटसम्राट मधील आप्पा बेलवणकर, वेलकम मधला 'कांदा ले लो' म्हणणारा भाई, अब तक छप्पन मधला चक्रव्युहात फसलेला अन् शांतपणे डाॅनचा गळा आवळणारा डॅशींग पोलीस अधिकारी या भूमिका अजरामर करून नाना गेले. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. काही माणसं फक्त अभिनय करत नाहीत, तर ती भूमिका जगतात. काही आवाज फक्त कानावर पडत नाहीत, तर ते मनाच्या खोलवर उमटतात. काही कलाकार पडद्यावरून दूर गेले तरी त्यांची कला त्यांचे संवाद आणि त्यांची छाप कायम आपल्या मनात जिवंत राहते. अशाच एका असामान्य कलाकाराला आपण गमावले आहे. नाना पाटेकर हे नाव म्हणजे केवळ अभिनेता नव्हे तर अभिनयाची एक स्वतंत्र ओळख होती. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांमधील तीव्रता, आवाजातील धार आणि संवादफेकीतील ताकद यामुळे त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. त्यांच्या दमदार अभिनयाने अनेक पिढ्यांना प्रभावित केले. पण नाना पाटेकर यांची खरी ओळख केवळ रुपेरी पडद्यापुरती मर्यादित नव्हती. समाजातील सामान्य माणसाच्या वेदना, संघर्ष आणि अडचणी यांच्याशी जोडलेली त्यांची संवेदनशील बाजूही अनेकांना भावत होती. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक धगधगता अध्याय काळाच्या पडद्याआड गेला. आपल्या अस्सल अभिनयाने, भारदस्त आवाजाने, डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याच्या विलक्षण शैलीने आणि प्रत्येक भूमिकेला जिवंत करण्याच्या सामर्थ्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना गेले, यावर खरंच विश्वास बसत नाही. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर ते अभिनयाची एक स्वतंत्र शाळा होते. पडद्यावर त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू बनून समोर यायचे. त्यांच्या अभिनयात दिखावा नव्हता. होती ती सहजता, तीव्रता आणि माणसाच्या भावविश्वाला भिडण्याची ताकद. त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक मान-सन्मान मिळाले. नाना म्हणजे रांगडा आवाज, तितकाच संवेदनशील मनाचा कलाकार. त्यांच्या संवादफेकीतला ठामपणा आणि अभिनयातील प्रामाणिकपणा प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग, डोळ्यांतील वेदना, ओठांवरचे उपरोधिक हास्य किंवा संवादातील आक्रमकता प्रत्येक गोष्ट पडद्यावर खरी वाटायची. समाजातील सामान्य माणसाच्या वेदनेशी त्यांचे नाते होते. शेतकरी आणि गरजूंसाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. प्रसिद्धीपासून दूर राहून मदतीचा हात पुढे करणारा हा कलाकार म्हणूनही ते अनेकांच्या स्मरणात राहतील. आज त्यांचा आवाज शांत झाला आहे. पण त्यांनी साकारलेली पात्रे शांत होणार नाहीत. सच्चा, दुर्मिळ आणि मनाला भिडणारा माणूस, स्पष्ट बोलणारा, शब्दांनी समोरच्याला आरसा दाखवणारा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उभा राहणारा असा सच्चा मराठी माणूस पुन्हा होणे नाही. ना कसला बडेजाव, ना दिखावा. जे मनात तेच ओठावर. ही हिंमत फक्त नानांमध्येच होती. परिंदा, क्रांतिवीर, नटसम्राट मधला अभिनेता गेला नाही, तर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रडणारा, लढणारा एक दुर्मिळ माणूस गेला. खरोखर महाराष्ट्र पोरका झाला. नाना 'नटसम्राट' होते आणि कायम राहणार
Previous Post Next Post