निकाल अपेक्षेप्रमाणेच, पण पारनेरची गडबड अनपेक्षित! ; कोण आहेत चेअरमनपदाच्या स्पर्धेत…
फडणवीस-विखे यांच्या पसंतीने बँकेचा अध्यक्ष थोरात गटाचा | उपाध्यक्ष विखे गटाचा; सचिन जगताप, दत्ता पानसरे यांचे नाव चर्चेत | तडजोडीतून गडाख होऊ शकतात अध्यक्ष.
सारिपाट / प्रशांत बाफना
जिल्हा बँकेचा निकाल समोर आलाय. कागदावर विखे – थोरात – गडाख यांच्या सहकार विकास आघाडीला २१ पैकी १७ जागा आणि अपक्ष संजीवनी शिंदे यांचा पाठिंबा अशा १८ जागा मिळाल्यात तर सभापती राम शिंदे गटाचे २ संचालक आणि नीलेश लंके यांचा १ संचालक असे तीन विरोधी संचालक मिळून २१ संचालक झाले. म्हणजेच बँकेची सत्ता सहकार विकास आघाडीकडेच राहिली. यात आश्चर्य काहीच नाही. कारण ११ जागा तर आधीच बिनविरोध झाल्या होत्या. खरी लढत १० जागांवर होती, त्यातही ७ जागा आघाडीने जिंकल्या. पण पारनेरमध्ये जे घडले ते अनपेक्षित होते. २४ मतांच्या फरकाने खा. नीलेश लंके निवडून आले. राहुल शिंदे हे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत. समोर विद्यमान खासदार. तरीही राहुल शिंदे यांनी ४० मते घेतली. याचा अर्थ असा नाही की राहुल शिंदे हरले, याचा अर्थ असा आहे की पारनेरमध्ये लंके यांच्या विरोधात ४० सोसायट्या ठामपणे उभ्या राहिल्यात. हेच ते पारनेरचे कवित्व आहे, जे आता नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेपर्यंत पुरणार आहे.
राम शिंदे-खा. लंके यांचा अंकुश राहणार!
बँकेची सत्ता विखे-थोरातांकडे आली, पण खा. लंके-राम शिंदे यांच्या रूपाने बँकेत पहिल्यांदाच विरोधकांचा अंकुश आला आहे. पारनेरचा विजय हा लंके यांच्यासाठी ऑसिजन ठरला आहे. यापूर्वी स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी ही भूमिका निभावली. आता साखर कारखानदारीच्या बाहेरील राम शिंदे आणि खा. लंके ही जोडगोळी बँकेत आली आहे.
फडणवीस-विखे-थोरात यांच्यातील तडजोडीकडे लक्ष!
अध्यक्षपदाच्या बाबत सुजय विखे यांच्या वक्तव्याचा विचार केला तर त्या नावामागे फडणवीस-विखे-थोरात यांच्यातील तडजोड लपलेली दिसते. बँकेचा अध्यक्षपदाचा तो चेहरा जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षांच्या सहकार राजकारणाची दिशा ठरवणार आहे. त्यामुळेच सुजय विखेंच्या धक्का बसेल या वायानंतर शंकरराव गडाख, मोनिका राजळे या दोघांची नावे समोर येऊ शकतात. या दोघांकडे अनुभव आहे, ते बाळासाहेब थोरातांचे विश्वासू मानले जातात. संजीवनी शिंदे-गायकर (अकोले) यांचे नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटू नये. त्या अपक्ष जिंकल्या, माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या आहेत. अकोलेसारख्या अवघड मतदारसंघात किरण लहामटे यांना हरवले. त्यांना अध्यक्ष केले तर अकोलेचे राजकारणही साधले जाईल आणि महिला अध्यक्ष म्हणून नवा चेहरा मिळेल. बिपीन कोल्हे आणि रणजितसिंह देशमुख हा थोरात गटाचा सेफ ऑप्शन असू शकतो. दोघेही थोरात गटाचे विश्वासू. कोपरगाव आणि संगमनेरमधून बिनविरोध. वाद नसलेले, सगळ्यांना चालणारे चेहरे. थोरातांना हवे असेल तर ते यांच्यापैकी एकाला पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँकेचा अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार?
माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले होते की, अध्यक्षपदाचे नाव समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसेल! याचे अनेक अर्थ निघतात! बँकेचा अध्यक्ष थोरात गटाचाच असणार, पण तो विखेंच्या मर्जीचा असेल असा पहिला अर्थ यातून निघतो. आकडेवारी पाहता १८ पैकी थोरात गटाचे १२ संचालक, विखे गटाचे फक्त ६ संचालक दिसून येतात. संख्याबळाने अध्यक्ष थोरात गटाचाच व्हायला पाहिजे. पण बँकेचे खरे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे सुजय विखेंनीच सांगितले. म्हणजे थोरात गटाला अध्यक्षपद देऊनही, त्यावर भाजपचा कंट्रोल राहणार. कालपर्यंत शंकरराव गडाख, मोनिका राजळे, किंवा सुजय विखे ही नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत होती. पण सुजय विखे यांनी धक्का बसेल असे म्हटले! याचा अर्थ हे तिघेही नाहीत. बँकेत कोणत्या पक्षाचे किती, हे पाहण्यापेक्षा कोणत्या विचाराचे किती, हे पाहावे लागेल. सत्ताधारी सहकार विकास आघाडी हीच मुळात भाजप-काँग्रेसची युतीची आहे. त्यामुळे अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी, तो भाजपला चालणारा असावा लागेल आणि उपाध्यक्ष भाजपचा असणार, हे जवळपास निश्चित.
पारनेरमध्ये विखे पाटलांना अंडरएस्टिमेट करणार्यांचे धाबे दणाणले!
पारनेरमध्ये लढत राहुल शिंदे विरुद्ध खा. नीलेश लंके अशी मतपत्रिकेवर होती. मात्र, ही लढत सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशीच होती. विखे पाटलांवर प्रेम करणार्या आणि त्यांच्या पदाचा फायदा घेत अनेक कामे मार्गी लावून घेत मतदानाचा शब्द देऊनही न पाळणार्यांचे धाबे आता दणाणले आहेत. सुजय विखे पाटलांनी पारनेरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली, हे त्यांचे मोठेपण आहे. पण त्यांच्या मनातील सल वेगळीच आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यातील काही बहाद्दरांनी राहुल शिंदे यांना नव्हे तर थेट सुजय विखे यांनाच दगाफटका केला.
खा. नीलेश लंके व समर्थकांना बुस्टर डोस मिळाला!
खा. लंके यांचा हा विजय फक्त जिल्हा बँकेचा विजय नाही. हा २०२४ च्या लोकसभेचा रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न विखे गटाने केला होता, त्याला बँकेच्या निकालाने दिलेले उत्तर आहे. आता याच बळावर लंके समर्थक पारनेर नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या तयारीला लागणार, हे उघड आहे. पारनेरमध्ये आता खासदार विरुद्ध पालकमंत्री ही लढाई थेट गावपातळीवर जाणार आणि संघर्ष देखील होणार!
गंमत करणार्यांची गंमत करताना दिसू शकतात सुजय विखे!
पारनेरमध्ये राहुल शिंदे यांना पराभूत करण्यात लंके समर्थकांची ताकद कमी अन् विखे यांच्यासोबत रोजचा राबता ठेवणार्यांची ताकद जास्त मिळाली. यातील अनेक मातब्बरांना नगर पंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यापाठोपाठ येणार्या ग्रामपंचायत निवडणुकीत विखे पाटलांची ताकद मिळण्याची शक्यता कमी आहे. ज्यांनी- ज्यांनी मतदान करताना गंमत केली त्यांची गंमत करताना सुजय विखे पाटील दिसल्यास आश्चर्य वाटू नये!

