नवापूर तालुक्यात जि. प.च्या जीर्ण शाळेचे छत कोसळले; शिरवेसह सर्व शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट आवश्यकशिक्षण विभाग लक्ष देण्याची गरज (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) :दोन दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी सरपंचाने आंदोलन केले असताना त्याच तालुक्यातील शिरवे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळांच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जि.प. प्रशासनासह शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या प्रश्नाला गांभीयनि घेण्याची गरज आहे. यानिमित्ताने सर्व इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिरवे येथील जि.प. शाळेत इयत्ता 1ली ते 4थीचे वर्ग असून या शाळेच्या इमारतीतील खोल्या जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने या इमारतीत अध्यापन बंद करण्यात आले होते. यासाठी ग्रामपंचायतीच्या इमारतीत गेल्या काही दिवसांपासून वर्ग भरविण्यात येत आहेत. शिरवे ग्रामपंचायत प्रशासनाने शाळेच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी नवापूर पंचायत समिती व नंदुरबार जिल्हा परिषदेकडे शाळा दुरुस्तीची व नवीन बांधकामासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा देखील केला. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने त्यावर कधीच लक्ष दिले नाही, असे ग्रामपंचायत सदस्य एन.जी. वसावे यांनी सांगितले. पडक्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जीव मुठीत धरून या गावातील शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तर याचा परिणाम या शाळेतील पट संख्येवर देखील होत आहे. सध्याच्या परिस्थितीत नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी तीन भाषिक मराठी, गुजराती व उर्दू माध्यमाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडबारा शाळेच्या नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी अर्ध नग्न आंदोलन केले. त्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गावातील जीर्ण व पडक्या शाळांच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी आंदोलनाची वाट पाहत तर नाही ना? असा संतप्त सवाल यावेळी शिरवे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपस्थित केला आहे. यावेळी जि.प. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या जीर्ण अवस्थेमध्ये आहेत. काही शाळांचे छप्पर कोसळत आहे तर काही शाळांचे पत्रे फुटल्याने गळके छत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या अनेक सवलती उपलब्ध असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अशी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ न करता तात्काळ पडझड झालेल्या शाळेची दुरुस्ती करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0