वलसाडला पकडला 'तोतया टीसी'; संशयित निघाला नंदुरबार तालुक्यातील.... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : तिकीट तपासनीस असल्याचे भासवून प्रवाशांकडे रेल्वे तिकिटांची तपासणी करणाऱ्या एका संशयिताला वलसाड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. तोतयेगिरी करीत असल्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा संशयित तोतया तिकीट तपासनीस नंदुरबार तालुक्यातील दुधाळे ग्रामपंचायत शिवारातील असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. याविषयी मिळालेली माहिती अशी, वलसाड रेल्वे स्थानकातील फुट ओव्हर ब्रिजवर एक व्यक्ती तिकीट तपासनीस असल्याचे भासवून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे तपासणीसाठी तिकीट मागत असताना काही प्रवाशांना त्याचा संशय आला. त्यातील काही प्रवाशांनी तिकीट परीक्षक ए.पी. पांडे यांना त्या विषयी माहिती दिली. त्यांनी लगेचच रेल्वे सुरक्षा गार्डच्या मदतीने ब्रिजवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी तिकीट तपासणी करणारा तो संशयित तोतया तपासणीस (डुप्लिकेट टीसी) असल्याचे लक्षात येताच त्याला जागेवरच पकडण्यात आले. अधिकची चौकशी केली असता त्याला कोणतेही उत्तर देता आले नाही. सदर संशयित व्यक्तीकडे नंदुरबार तालुक्यातील दुधाळे ग्रामपंचायतच्या ग्रामरक्षक दलाचे ओळखपत्र आढळून आले असून त्याचे नाव समाधान सामुद्रे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान तिकीट परीक्षक पांडे यांनी रेल्वे पोलिसांना लेखी तक्रार देऊन या संशयीताला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्यात येत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0