घरकुल पुर्ण करण्यासाठी खेचरवरून होते वाहतूक केलापाणी येथील आदिवासींची जगण्यासाठी संघर्ष बिरसा फायटरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन.. (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार )नंदुरबार:- स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही धडगांव तालुक्यातील केलापाणी येथील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना अजूनही मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. शासनाने घरकुल दिले परंतू ते बांधणीसाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतो आहे. लाभार्थ्यांना घरकुलचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी गाढव, खेचर ई. वरून माल वाहतूक करावी लागते तसेच गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी बाम्बुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते हे वास्तव आहे. या गावात दवाखाना नाही, रस्ता नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, वीज नाही, पाणी नाही. अजूनही मूलभूत सुविधा या गांवात पोहचल्याच नाहीत. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडोचा निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते, परंतू प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी, ह्या योजना जातात तरी कुठे? लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय? असा प्रश्न निर्माण होतो.केलापाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी, दिलवरसिंग चौधरी, गुंजाऱ्या चौधरी, टेम्बऱ्या चौधरी, जालमासिंग चौधरी, अमरसिंग चौधरी, रमेश वसावे, आमच्या वसावे, खेमजी वसावे, सुकराम वसावे, खुमान वसावे, कर्मा वसावे, गोस्वामी वसावे, दाजला वळवी, पोहल्या वळवी, डिगा वळवी, मुंगल्या वळवी, बोडा वसावे, दौलत वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणमाळ रस्त्याला लागून केलापाणी ते शेगलापाणी ५ किमीचा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे. जिल्हा परिषद नंदूरबार अंतर्गत जल जीवन मिशन योजनेंतर्गत स्थानिक ठिकाणी हापसे, विहीरी मंजूर करून तात्काळ काम सुरू करावे. ग्रामपंचायत केलापाणी, पाटीलपाडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे (दवाखाना) काम तात्काळ सुरू करण्यात यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलापाणी, पाटीलपाडा येथील शाळा तोरणमाळ येथे स्थलांतरित झाली आहे. ती शाळा पुन्हा केलापाणी, पाटीलपाडा येथे सुरू करण्यात यावी. शाळेची इमारत बांधकाम करण्यात यावी.अंगणवाडी इमारतीचे पक्के बांधकाम करण्यात यावे. केलापाणी गांवात केलापाणी, पाटीलपाडा, शेगलापाणी, कुड्यापाडा येथे विद्युतीकरण करून विजेची तात्काळ सोय करण्यात यावी. अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या ८ दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा बिरसा फायटर्स व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या आदिवासी संघटनांनी दिला आहे
byMEDIA POLICE TIME
-
0