‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यामागील कारणे जाहीर करावीत– सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी.. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक ) शहादा : अक्राणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शकते संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. योजनेची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अनेक लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. मात्र, या महिलांना अपात्र ठरवण्यामागील स्पष्ट कारणे अद्याप शासन अथवा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीत, अशी तक्रार ढोले यांनी केली आहे.योजना लाभासाठी सुरू असलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमध्ये देखील अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसी करताना वडील (अविवाहित महिला) किंवा पती (विवाहित महिला) यांचा आधार क्रमांक अनिवार्य केल्यामुळे, ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, त्यांच्यासमोर तांत्रिक अडचणी उभ्या राहत आहेत. त्यामुळे अशा लाभार्थींना ई-केवायसी पूर्ण करता येत नसल्याचे ढोले यांनी निदर्शनास आणले आहे.याशिवाय, लाभार्थींना आवश्यक ते अपडेट मिळावे यासाठीची योजनेची वेबसाईट खूपच हळू कार्यरत असल्याने, महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना वेळ व तांत्रिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत संबंधित अडथळे दूर करून प्रक्रिया सुलभ करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.जितेंद्र ढोले यांनी यासंदर्भात निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना ई-मेलद्वारे पाठवली असून, योजनेत पारदर्शकता यावी आणि लाभार्थींना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0