'प्रिय शालिकदा...स' पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न. पत्रवाचना वेळी सर्व सभागृह झाले भावुक.. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ). भद्रावती, दि. २८ : साईप्रकाश बहुउद्देशीय कला व शिक्षण संस्था भद्रावती द्वारा प्रकाशित व सेवा निवृत्त मुख्याध्यापक 'शालिक दानव' संपादित प्रिय शालिकदा...स या पत्र संग्रहाचा प्रकाशन सोहळा दि.२६ ऑक्टोबर रोजी जय गुरुदेव लॉन भद्रावती येथे पार पडला. या प्रसंगी कला प्रदर्शनी, प्रकट मुलाखत व बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये या संपादित पुस्तकाचे प्रकाशन नाट्य, टीव्ही, लघु चित्रपट बाल अभिनेता आरुष देवळेकर, मुंबई यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी हेमा बहादे, सूत्रसंचालिका,आकाशवाणी चंद्रपूर केंद्र, प्रवीण आडेकर, गझलकार व अध्यक्षस्थानी प्राध्यापक धनराज आस्वले सामाजिक कार्यकर्ते हे होते. तर या पुस्तकाला भाष्यकार म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप देशमुख लाभले. शालिक दानव यांना १९८३ ते आजतागायत आलेल्या १५०० पेक्षा जास्त बालमित्रांच्या पत्रसंग्रहांतून १५२ पत्रांचा संग्रह त्यांनी या पुस्तक रूपात संपादित केला आहे. "आपल्यात जे चांगले गुण आहेत ते चांगल्या पद्धतीने समोर आणायचे आणि त्याला वाव द्यायचा, पालकांनी सुद्धा मुलांतले गुण समोर येऊ द्यायचे. आधी इंजिनियर, डॉक्टर, आर्ट, सायन्स, कॉमर्स एवढंच क्षेत्र होतं पण आज भरपूर क्षेत्र आहेत. जसे संचालन, गायन, संगीत, कला, खेळ इत्यादी. पदवी शिक्षण अवश्य घ्यायचे पण ज्या क्षेत्रात आवड आहे तिकडेच जायचे. आज आधुनिक युगात खूप क्षेत्रांत वाव आहे "असे आपल्या मनोगतात हेमा बहादे यांनी सांगितले. या प्रसंगी त्या काळात शालिक दानव यांना केवळ त्यांचे नाव असलेले पत्र घरपोच आणून देणाऱ्या सेवा निवृत्त पोस्टमन आर्यनजी मेश्राम यांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या त्या काळातील आठवणींना उजाळा देत वातावरण भावुक केले. शालिकदांना त्या काळात पत्र पाठविणारे बालमित्र जे आज वेगवेगळ्या शहरात मोठमोठ्या क्षेत्रात कार्यरत आहेत ते पत्र मित्र मोठ्या संख्येने आवर्जून या सोहळ्यात उपस्थित होते. त्यांचाही सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. या पुस्तकाकरिता साजेसे मुखपृष्ठ व संकल्पना मांडणारे कला शिक्षक विनोद ठमके यांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली यात उमर शकील हनफी यास उत्तम पत्रलेखनाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच या प्रसंगी साईप्रकाश कला अकादमीच्या मुलांची कला प्रदर्शनी आयोजित करण्यात आली यात प्रथम क्रमांक कुमारी ग्रीष्मा राजू भैसारे, द्वितीय क्रमांक कुमारी पहल प्रीतम नळे व तृतीय क्रमांक श्रीयांशी राजेश मस्के यांनी पटकावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवंत कुत्तरमारे, सूत्रसंचालन विवेक महाकाळकर तर आभार प्रदर्शन सुरेंद्र हनुमंते यांनी केले. दुसऱ्या सत्रात 'मी असा घडतोय' या सदरात मास्टर आरुष देवळेकर याची प्रकट मुलाखत बालकुमार फण अँड लर्न चे विद्यार्थी कुमारी लक्ष्मी भडगरे व मास्टर हृदयांश मस्के या बालकांनी घेतली. बाल मनातले प्रश्नांची आतिशबाजी करीत आरुषचा संपूर्ण कला प्रवास व दैनंदिन जीवनपट त्यांनी बोलता केला. प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवणारा असा हा विनोदी व खुमासदार मुलाखतीचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन गजानन डंबारे यांनी केले. विवेक महाकळकार यांनी पोस्टमनच्या भूमिकेत सायकलवर प्रवेश करून शालिकदांची काही पत्र पार्श्व संगीता सह वाचून दाखवले. त्या पत्रांतील मजकुराने वातावरण भावुक झाले शालिकदासह कित्येकांना अश्रू आवरता आले नाही. तिसऱ्या सत्रात 'आम्ही कवितेतून बोलू' या शीर्षकाखाली बालकवी संमेलन पार पडले. यामध्ये शहरी तथा आजूबाजूच्या खेडे विभागांतून ३१ बालकांनी आपल्या कविता सादर केल्या. शाळा, शिक्षण, व्यसन, साक्षरता, प्रवास या विविध विषयांवरील कवितांनी बहार आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत उज्वलकर व स्वतः शालिक दानव यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता श्रीकांत भिडीकर, साईप्रकाश कला अकादमी, झाडीबोली साहित्य मंडळ, बालकुमार फन अँड लर्न, श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0