अवघ्या काही तासांत गुन्हा उघड; सोनं व रोख रक्कम हस्तगत..!भद्रावती पोलिसांच्या जाळ्यात आरोपी. (.!महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.20:- भद्रावती शहरात घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात भद्रावती पोलीस स्टेशन यांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीस अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी तनुज अनिल पंढीले (वय ३०, व्यवसाय ठेक्केदारी, रा. देवालय कॉलनी, भद्रावती) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी ते कुटुंबासह यवतमाळ येथे लग्नासाठी गेले होते. रात्री सुमारे ८ वाजता घरी परतल्यानंतर त्यांच्या बंद घरातून एक सोन्याचे ब्रासलेट व पर्समधील ३ लाख ५० हजार रुपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.या तक्रारीवरून अप.क्र. ७७९/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने मुखबिरांच्या मदतीने तपास सुरू केला.तपासादरम्यान बंटी सुभाषचंद्र बद्रा (वय ४४, रा. वॉर्ड क्र. ४, संत नगर, खापरखेडा, नागपूर; सध्या संताजी नगर, भद्रावती) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पंचासमक्ष १५.९३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट (किंमत अंदाजे १ लाख ४८ हजार) व ५० हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली.तसेच उर्वरित३ लाख रुपये आरोपीने स्वतःच्या बँक ऑफ बडोदा, भद्रावती येथील खात्यात जमा केल्याची पावती पोलिसांनी हस्तगत केली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, तसेच गुन्हे शोध पथकातील गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोडे, प्रेम बावनकर यांनी केली.भद्रावती पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अवघ्या काही तासांत गुन्हा उघड; सोनं व रोख रक्कम हस्तगत..!भद्रावती पोलिसांच्या जाळ्यात आरोपी.                      
Previous Post Next Post