वर्धा खेळांमधील यश अथवा अपयश विद्यार्थ्यांना जीवनातील विविध परिस्थिती समर्थपणे हाताळण्याची शिकवण देते. खेळांमुळे शिस्त, वेळेचे नियोजन, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होतो. नियमित खेळामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते, परिणामी विद्यार्थ्यांची एकाग्रता व अभ्यासातील कार्यक्षमता वाढते. तसेच खेळांमुळे सामाजिक कौशल्ये वृद्धिंगत होऊन परस्पर संबंध दृढ होतात, असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले.विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीत खेळांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीच देत नाहीत, तर मानसिक विकास साधून जीवनासाठी आवश्यक असलेली अनेक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतात, जी यशस्वी करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.दि. १९ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात लॉयन्स ट्रेडिशनल शोतोकान कराटे-डो असोसिएशन, वर्धा शाखेच्या विद्यार्थी कैवल्य चिंतामन सागरकर याचा सत्कार करताना ते बोलत होते. कैवल्य सागरकर यांनी नुकत्याच नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत कराटे प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. तो अग्रगामी कॉन्व्हेंट मसाळा शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. यावेळी अनुराग जैन यांनी कैवल्य यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव केला.या कार्यक्रमास युनिव्हर्सल मार्शल आर्ट अकादमीचे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही, लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष विजय सत्याम, लॉयन्स ट्रेडिशनल शोतोकान असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव कोषी उल्हास वाघ, प्रशिक्षक सिहान साहिल वाघ, सेन्साई अमोल मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.कैवल्य सागरकर यांचे अग्रगामी शाळेचे प्राचार्य जस्सी जोसफ, डॉ. विनोद अदलखिया, डॉ. प्रदीप कश्यप, असद खान पटेल, विजय सिंह ठाकुर, सुनील चौधरी, तुषार देवढे, इब्राहिम बख्श, प्रविण चोरे आदी अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. कैवल्य सागरकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य जस्सी जोसफ तसेच कोषी उल्हास वाघ यांना दिले आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

Previous Post Next Post