योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या तरच विकास शक्य – मुख्याधिकारी रामनिवास झंवर चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे ग्रामीण शिबिर उत्साहात प्रारंभ... (सत्रासेन ता.चोपडा(प्रतिनिधी)- ग्रामीण भागाचा विकास हाच खऱ्या अर्थाने भारताचा विकास आहे.आजही देशाचा बहुसंख्य भाग ग्रामीण असून, या भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. हे महत्त्वपूर्ण कार्य समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून करीत असतात,असे प्रतिपादन चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले.ते समाजकार्य महाविद्यालय, चोपडा यांच्या वतीने धनाजी नाना प्राथमिक तसेच डी.आर.बी.माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,सत्रासेन येथे आयोजित सात दिवसीय ग्रामीण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांच्या वतीने समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी सत्रासेन, ता. चोपडा येथे सात दिवसीय ग्रामीण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना पावरा होत्या.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भादले यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ.पुनम गुजराथी व उपाध्यक्षा सौ.छाया गुजराथी उपस्थित होत्या.विचारपीठावर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ईश्वर सौंदाणकर,उपप्राचार्य प्रा. डॉ.आशिष गुजराथी,प्रा.डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.मोहिनी उपासनी,मुख्याध्यापक जगदीश महाजन,उच्च माध्यमिक शिक्षक भालचंद्र पवार,प्रा.डॉ.विनोद रायपूरे,पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेच्या आद्य संचालिका डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राहुल निकम यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून ग्रामीण शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. समाजकार्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश पाठक यांनी ग्रामीण शिबिराचे महत्त्व विशद केले.प्राचार्य प्रा.डॉ.ईश्वर सौंदाणकर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात ग्रामीण शिबिराचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भादले यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे,असे आवाहन केले.प्रमुख अतिथी सौ.पुनम गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा देत, समाजाकडून शिकत असताना समाजाला काहीतरी देण्याची भावना जोपासण्याचे आवाहन केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.मारोती गायकवाड व प्रा. डॉ. मोहिनी उपासनी हे संयोजक म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संदीपा निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या ग्रामीण शिबिरास समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0