भरारी पथक बंद आणि रेती माफिया पुन्हा मैदानात? प्रशासनावर सवाल..!घाट लिलावात, तरीही नदीपात्रात अवैध उत्खनन सुरूच? (महेश निमसटकर जिल्हा विभागीय संपादक भद्रावती) दि.1 :- भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून भरारी पथके बंद झाल्याची चर्चा आणि वाढलेली रेती वाहतूक यामुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रसंगी तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी हे रेती घाट अधिकृत लिलाव प्रक्रियेत देण्यात आलेले आहेत. मात्र वायगाव नाला, आष्टा येथील ईरई नदी, चारगाव परिसरातील वर्धा नदी तसेच तालुक्यातील काही नाले व इतर नदीपात्रांमधून चोवीस तास मोठ्या प्रमाणावर जेसीबी आणि हायवा वाहनांच्या माध्यमातून रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान सध्याचे तहसीलदार शेतकरी आत्महत्या प्रकरण गाजत असताना सुमारे चार ते पाच महिने दीर्घ रजेवर होते. त्या काळात तत्कालीन तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त विशेष भरारी पथकांची स्थापना केली होती. प्रत्येक पथकात एक मंडळ अधिकारी आणि तीन तलाठी असा समावेश होता. या पथकांनी अवैध रेती उत्खननावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करून शासनाचा महसूल वाढविला होता आणि अनेक ठिकाणी अवैध वाहतूक रोखण्यात यश मिळवले होते. मात्र सध्याचे तहसीलदार रुजू झाल्यानंतर ही भरारी पथके कार्यरत नसल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर तालुक्यातील काही नाले, नदीपात्रे व घाट परिसरातून अवैध रेती वाहतूक पुन्हा वाढल्याचा आरोप होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महसूल विभागातील एक कर्मचाऱ्यामार्फत चिरीमीरी गोळा केली जात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. संबंधित कर्मचाऱ्याकडे गौण खनिजाचे काम सोपविण्यात आले असल्याचे सांगितले जाते. काही रेती तस्करांकडून अवैध उत्खननास मुखसंमती असल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा असली तरी यास अधिकृत दुजोरा उपलब्ध नाही. दरम्यान, चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथके सक्रिय ठेवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. तरीही ती पथके सध्या बंद का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि अवैध रेती उत्खननावर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करून जनतेतील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भरारी पथक बंद आणि रेती माफिया पुन्हा मैदानात? प्रशासनावर सवाल..!घाट लिलावात, तरीही नदीपात्रात अवैध उत्खनन सुरूच?                                                            
Previous Post Next Post