ब्रेकिंग न्युज....भावाकडुन बहिणीची हत्या.. भद्रावती शहर हादरले.*झिंगुजी वॉर्डमध्ये घरगुती वादातून 30 वर्षीय तरुणीची तलवारीने हत्या; आई गंभीर जखमी* (महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.25:- भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे घरगुती वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली असून भावानेच आपल्या 30 वर्षीय सख्ख्या बहिणीची तलवारीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईलाही गंभीर जखमी करण्यात आले असून तिच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृत तरुणीचे नाव संजीवनी भोंडे (वय 30 वर्षे) असे असून आरोपी भाऊ सुरज भोंडे याने तलवारीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घरातील किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक चिघळला आणि संतापाच्या भरात सुरजने घरात असलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेदरम्यान मध्ये पडलेल्या आई पुष्पा भोंडे यांनाही तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातावर व शरीरावर खोल जखमा झाल्या असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना तात्काळ भद्रावती येथून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी पती शंकर भोंडे यांनी मुलगा सुरज याला भडकावून ही हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबातील वातावरण काही काळापासून तणावपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मुलगा सुरज भोंडे व वडील शंकर भोंडे हे दोघे वेगळे स्वयंपाक करून स्वतंत्रपणे राहत होते व जेवत होते. तर संजीवनी भोंडे आणि तिची आई पुष्पा भोंडे या दोघी बाहेर कामकाज करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होत्या. कुटुंबातील मतभेदांमुळे घरात कायम वादाचे वातावरण असल्याची चर्चा परिसरात आहे.संजीवनी ही अत्यंत बुद्धिमान व कष्टाळू मुलगी म्हणून परिसरात परिचित होती. तिने पदवी शिक्षण पूर्ण केले होते व नोकरीच्या शोधात होती. पोलीस भरती तसेच लष्कर भरतीसाठीही तिने प्रयत्न केले होते. विविध शासकीय व खासगी नोकऱ्यांसाठी अर्ज भरले होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी ती ब्युटी पार्लरचे काम करून घरखर्चात सहकार्य करीत होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे. आरोपीला संपूर्ण मालमत्ता एकट्याच्या नावे हवी होती, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज भोंडे व त्याचे वडील शंकर भोंडे यांना ताब्यात घेतले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे झिंगुजी वॉर्ड परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0