समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे ही पत्रकारांची जबाबदारी , प्रतापराव जाधव!वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात जेष्ठ संपादक अनुपम कुमार भार्गव व शंकर बोरघरे यांचा गौरव.. (महेश निमसटकर जिल्हा संपादक चंद्रपुर )भद्रावती दि.1:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. प्रसंगी अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार हा समाज व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, सत्य आणि निष्पक्ष भूमिकेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे ही पत्रकारांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवत समाजप्रबोधनाची भूमिका पत्रकारांनी कायम राखावी, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. दिनकरराव वाटाणे होते. प्रारंभी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अधिवेशनास सुरुवात करण्यात आली. राज्यभरातील पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनात विदर्भ प्रमुख अनुपम कुमार भार्गव व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर नामदेवराव बोरघरे यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट संघटक” पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनात्मक बळकटी, तळागाळातील पत्रकारांना आधार, जिल्हानिहाय समन्वय आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. हा राज्यस्तरीय पुरस्कार संघटनेचे मार्गदर्शक व राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने राज्यभरात संघटनात्मक उभारणीस गती दिली असून, त्याचाच परिपाक म्हणून विदर्भातील नेतृत्वाचा हा गौरव मानला जात आहे. दरम्यान, संघटनेचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रा. महेश पानसे यांनी मूल्यनिष्ठ पत्रकारिता व शिस्तबद्ध संघटन हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच चंद्रपूर जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनी विदर्भातील पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले. द्वितीय सत्रात “सायबर युगातील माध्यमे व मूल्यनिष्ठ पत्रकारिता” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सत्य, संयम आणि समाजहित हेच पत्रकारितेचे मूलमंत्र असल्याचा संदेश देण्यात आला. अधिवेशनात विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वाशिम येथे वर्षांनंतर पार पडलेले हे राज्यस्तरीय अधिवेशन पत्रकार एकतेचा आणि संघटनात्मक बळाचा प्रभावी संदेश देणारे ठरले असून, विदर्भातील नेतृत्वाचा गौरव संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे ही पत्रकारांची जबाबदारी ,  प्रतापराव जाधव!वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात जेष्ठ संपादक अनुपम कुमार भार्गव व शंकर बोरघरे यांचा गौरव..                                                      
Previous Post Next Post