कुणाडा येथे पहाटे धडक; मनोज नंदीचे रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त! (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती, दि.7 :- भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरची वर्दळ सुरू असल्याने अनेक गावांतील नागरिक त्रस्त झाल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने मौजा कुणाडा परिसरात पहाटे धडक कारवाई करत रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता ही कारवाई केली. कारवाईदरम्यान फुकट नगर, भद्रावती येथील मनोज नंदी यांचे ट्रॅक्टर विनापरवाना रेती भरून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी तथा गौण खनिज पथक प्रमुख अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी संदीप मुरकुटे, तसेच महसूल कर्मचारी खुशाल तुरारे, राहुल भोंगळे आणि बंडू वेलफुलवार यांनी सहभाग घेतला. प्रसंगी सकाळी महसूल विभागाच्या सूत्रांकडून प्रत्यक्ष व्यक्तिगत व्हॉट्सअॅपवर कारवाईची माहिती व छायाचित्र पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली. या छायाचित्रात कारवाईनंतर पथक उपस्थित असल्याचे दिसून येते. छायाचित्रावर जीपीएस मॅप कॅमेरा द्वारे भद्रावती, महाराष्ट्र येथील लोकेशन तसेच ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३३ वाजताची वेळ नोंद झालेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कारवाईची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना व पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान नदीपात्राची स्थिती, उत्खननाची पद्धत तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत या घाटांवरील उत्खनन थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर नाले खोदण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचे समजते. याचदरम्यान भद्रावती तालुक्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या मांगली (रै) नाल्यातून रात्रीच्या वेळी रेती उत्खनन होत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चारगाव परिसरातील वर्धा नदी व पारोधी परिसरातील ईरई नदी भागातही रेती वाहतुकीबाबत हालचाली असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील काही लहान नाल्यांमधूनही रेती उत्खनन होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रसंगी अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिक व शेतकरी वर्गाकडून यावर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार व पर्यावरणीय अटींचे पालन करूनच पुढील काळात रेती उत्खनन व वाहतूक करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परिसरात रात्री सुरू असलेल्या ट्रॅक्टरच्या हालचालींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या हालचालींचा नेमका प्रकार काय, तसेच स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा सविस्तर खुलासा लवकरच पुढील भागात…
byमीडीया पोलीस टाईम
-
0