*५ वर्षांनंतर पातूरचा युवक घरी परतला**शांतिवनम आणि श्रद्धा फाउंडेशनमुळे कुटुंबाशी पुनर्मिलन**दोन्ही संस्थांच्या प्रशंसनीय कार्याची सर्वत्र चर्चा* (दूल्हे खान युसुफ खान पातूर) येथील काजीपुरा परिसरात राहणारा शेख अतीक शेख नसीर (वय ३३ वर्षे) सुमारे पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. आता पूर्ण पाच वर्षांनंतर सामाजिक संस्था श्रद्धा पुनर्वसन संस्थेच्या प्रयत्नांमुळे तो सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांमध्ये परतला असून, कुटुंबीय व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या निधनानंतर शेख अतीक मानसिकदृष्ट्या थोडा खचला होता. त्याच दरम्यान तो हैदराबाद येथे राहणाऱ्या आपल्या काकांसोबत त्यांच्या घरी गेला होता. तेथूनच तो हैदराबाद रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झाला. नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात शोधाशोध केली, मात्र त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.श्रद्धा संस्थेकडून आलेल्या प्रतिनिधींनी सांगितले की, शेख अतीक भटकत भटकत तमिळनाडू येथे पोहोचला होता. त्यानंतर तमिळनाडूतील त्रिची येथील शांतिवनम संस्थेला तो भटक्या अवस्थेत आढळून आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेऊन मागील पाच वर्षांपासून त्याच्या मानसिक आजारावर उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने दिलेल्या पत्त्यानुसार त्याला अकोला विभागातील नागपूर येथील श्रद्धा फाउंडेशनकडे सोपविण्यात आले.तेथे उपचार व निगा राखल्यानंतर पूर्णपणे बरा झाल्यावर शेख अतीकने आपल्या घराचा अचूक पत्ता सांगितला. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी श्रद्धा फाउंडेशनच्या पथकाने त्याला सुरक्षितपणे पातूर येथे आणून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. संस्थेच्या टीमने त्याच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक औषधेही कुटुंबीयांना दिली असून पुढे नियमित औषधोपचाराची जबाबदारीही स्वीकारली आहे.पातूर येथे सोडण्यासाठी आलेल्या पथकामध्ये सुनील कुमार दास (सामाजिक कार्यकर्ता), नितेश शर्मा (सामाजिक कार्यकर्ता), चेतना नयतमकर (परिचारिका) तसेच पिंकी जेना (सामाजिक कार्यकर्ता) यांचा समावेश होता.शेख अतीकच्या घरी परतण्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले असून परिसरात आनंदाची लहर पसरली आहे. सामाजिक संस्थांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रतिक्रिया:"आमचं मूल आम्हाला सुखरूप परत मिळालं आहे. मी दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानते व त्यांना मनःपूर्वक आशीर्वाद देते." (अतीकची आजी)"आमचे आणि आमच्या संस्थेचे ध्येयच हे आहे की भटक्या व मानसिक रुग्णांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवणे." — नितेश शर्मा (सामाजिक कार्यकर्ता)
byमीडीया पोलीस टाईम
-
0