लोकनेते स्व. संजय देवतळे स्मृतीदिन: जनतेच्या स्मरणार्थ वरोरा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर..!

लोकनेते स्व. संजय  देवतळे स्मृतीदिन: जनतेच्या स्मरणार्थ वरोरा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर..!

महेश निमसटकर 
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 



भद्रावती दि.24  :- जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे, गरिबांचे आधारवड ठरलेले लोकनेते तथा माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त २५ एप्रिल २०२६ रोजी वरोरा येथे भव्य नि:शुल्क सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून हजारो नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
    स्व. संजयजी देवतळे यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील वंचित, दुर्लक्षित व गरजू घटकांसाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या सेवाभावी विचारांना अभिवादन म्हणून आयोजित या शिबिरातून “सेवाच खरा धर्म” हा संदेश अधिक दृढ होत आहे.
     या शिबिरात मधुमेह (डायबिटीज), रक्तदाब व हृदयविकार तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोग निदान, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, हर्निया व इतर आजारांचे निदान, तसेच ईसीजी व विविध रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. याशिवाय भव्य रक्तदान शिबिर, आयुष्यमान (आरोग्य) कार्ड वितरण आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
    सदर शिबिर दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा (जि. चंद्रपूर) येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
    या उपक्रमाचे विनीत आमदार करण संजय देवतळे असून, स्व. संजय देवतळे मित्र परिवार व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.
     नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Previous Post Next Post