*काजळसरा येथे आंबेडकर जयंती कार्यक्रमात गोंधळ; आरोपी अटकेत, पोलिसांवर दगडफेक*
* सौम्य लाठीचार्जनंतर गावकऱ्यांचा पोलीस ठाण्यावर घेराव; अवैध दारू व्यवसाय बंद व संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
देवळी वर्धा तालुका प्रतिनिधी-
(रविंद्र पारीसे)
देवळी तालुक्यातील काजळसरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी (दि. 15 एप्रिल) अचानक गोंधळ उडाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असली, तरी गावकऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त करत उशिरापर्यंत देवळी पोलीस स्टेशनचा घेराव घातला.
काजळसरा गावातील बौद्ध विहारात जयंतीनिमित्त जेवणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत सुरू असताना गावातील रवींद्र भानुदास दुधे (रा. काजळसरा) हा नशेच्या अवस्थेत कार्यक्रमस्थळी आला. त्याने उपस्थित महिला व आयोजकांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. पुढे जेवणाची पंगत सुरू असताना त्याने दुचाकी थेट पंगतीत घालून अन्न उधळून लावल्याने वातावरण चिघळले. यामुळे आयोजक व आरोपी यांच्यात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले. मात्र, यानंतर गावात तणाव वाढला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ठाणेदार अमोल मंडळकर यांनी घटनास्थळी जमलेल्या जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या घटनेत पोलीस वाहनाचे नुकसान झाले असून गृहरक्षक दलातील एक जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
यानंतर रात्री उशिरा काजळसरा येथील शेकडो महिला व पुरुषांनी देवळी पोलीस स्टेशनवर धडक देत घेराव घातला. आरोपीवर कठोर कारवाई करण्याबरोबरच लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे या रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी संतप्त जमावाशी संवाद साधत आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या इतर मागण्यांचीही चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
*नागरिकांच्या प्रमुख मागण्या :-*
👉कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
👉लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे.
👉काजळसरा गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करावी.
👉भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.

