यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांचा ‘धडक’ आढावा; अधिकाऱ्यांना कडक फटकार, किनगाव आरोग्य केंद्र स्थलांतराचा निर्णय
(रविंद्र आढाळे विशेष जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषद जळगाव यांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी यावल पंचायत समितीत घेतलेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजावर कठोर भूमिका घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अपूर्ण कामे, कामातील ढिलाई आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “कामात कसूर अजिबात सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला.या बैठकीस गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी तसेच शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, घरकुल आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेताना करिष्मा नायर यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच विकासकामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. बैठकीनंतर करिष्मा नायर यांनी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. अपुऱ्या जागेमुळे सध्या हे केंद्र ग्रामीण रुग्णालयातील पी.एम. रूममध्ये चालवावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तरन्नूम शेख यांच्याशी चर्चा करून त्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली. “रुग्णांना दर्जेदार सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे सांगत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव लवकरच योग्य जागी स्थलांतरित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या धडक आढावा बैठकीमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून संबंधित विभागांना आता कामाचा वेग वाढवावा लागणार आहे. दरम्यान, नागरिकांमध्येही या कारवाईनंतर विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

