देगलूरमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा; कोट्यवधींची उलाढाल. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर). देगलूर: शहरात आयपीएल हंगाम सुरू होताच ऑनलाइन सट्टेबाजाराने भीषण रूप धारण केले असून, संपूर्ण शहरात जुगाराचे जाळे वेगाने पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गल्लीबोळापासून ते शाळा व महाविद्यालयांपर्यंत सट्ट्याची लागण पोहोचली असून, तरुणाई मोठ्या प्रमाणात या विळख्यात अडकत चालली आहे. मोबाईल अॅप्स, क्रोम व गुगलच्या माध्यमातून आयडी तयार करून सङ्गा खेळवला जात असून, यासाठी १० ते १५ हजार रुपयांची अमानत रकम घेऊन युजरनेम व पासवर्ड दिला जातो. त्यानंतर लाखो रुपयांचा सट्टा एका सामन्यावर लावला जात असून, दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. या सट्टा व्यवहारामुळे अनेक युवक कर्जबाजारी होत असून, नैराश्याच्या गर्तेत अडकत आहेत. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी अनेकांनी आपले आयुष्यच उद्धस्त करून घेतले असून, देशपांडे गल्लीतील एका तरुणाने सट्ट्याच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्याची घटना अजूनही ताजी आहे.विशेष म्हणजे, शाळकरी मुलांमध्येही सट्टा खेळण्याची प्रवृत्ती वाढत असून, हा प्रकार आता फॅशन बनत चालल्याने पालक वर्गात प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, देगाव नाका परिसरातील तथाकथित टी कंपनी' हे या सट्टा रॅकेटचे मुख्य केंद्र बनल्याची चर्चा असून, एका स्वयंघोषित मास्टरमाईंडच्या इशाऱ्यावर संपूर्ण व्यवहार चालत असल्याची माहिती समोर येत आहे. सीमेलगतच्या तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतून एजंट (फंटर) नेमून हे जाळे अधिक मजबूत करण्यात आले असल्याचेही बोलले जात आहे. या सट्ट्यात काही प्रभावशाली व्यक्ती व राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांचा सहभाग असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे.सर्वात गंभीर बाच म्हणजे या सर्व प्रकारांची माहिती पोलीस यंत्रणेला असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. ही निष्क्रियता की संगनमत? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात असून, या सट्टा रॅकेटमागील मास्टरमाईंडवर कठोर कारवाई करून त्याला तडीपार करावे तसेच संगनमत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. डीआयजी शहाजी उमाप व एसपी अबिनाश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीयनि दखल घेऊन तात्काळ छापेमारी करून ऑनलाइन व ऑफलाइन सट्टा पूर्णपणे बंद करावा, अशी एकमुखी मागणी पुढे येत आहे. आयपीएलच्या नावाखाली सुरू असलेले हे सद्वाराज आता केवळ बेकायदेशीर व्यवहार न राहता समाजासाठी धोक्याची घंटा ठरत असून, जर वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर आणखी किती युवक या विळख्यात सापडतील, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

