पत्रकार संजय भोकरे यांच्या जीविताला गंभीर धोका; रावेर येथे 'झेड प्लस' संरक्षणाची मागणी

पत्रकार संजय भोकरे यांच्या जीविताला गंभीर धोका; रावेर येथे 'झेड प्लस' संरक्षणाची मागणी

​रावेर (शेख शरीफ ):

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खंबीर नेतृत्व श्री. संजयजी भोकरे यांच्या जीविताला सध्या गंभीर धोका निर्माण झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भोकरे यांना तातडीने 'झेड प्लस' दर्जाचे कडक पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रावेर तहसील कार्यालयात गुरुवारी (१४ मे) धडक निवेदन देण्यात आले.
​संजय भोकरे यांच्यावर सध्या जीवघेणा हल्ला होण्याचा कट रचला जात असल्याची भीती पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, रावेर यांच्याकडे सुपूर्द केलेल्या निवेदनात प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रथम, श्री. भोकरे यांच्यावर असलेला संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना विनाविलंब चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा. द्वितीय, काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ भोकरे यांना मिळालेल्या धमक्या आणि सध्याच्या कटाचा आपसात काही दुवा आहे का, याची सखोल गुप्तचर चौकशी करण्यात यावी. तसेच, या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) कोण आहे आणि पडद्यामागून हालचाली करणारे चेहरे कोणते आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
​लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत निर्भीडपणे काम करणाऱ्या संजय भोकरे यांच्या सुरक्षिततेबाबत गृह मंत्रालयाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे. हे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य व उत्तर महाराष्ट्र संघटक  विनोद कोळी(शिवा भाई G), जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सुरेश पवार, राजेंद्र सोनार (अध्यक्ष), विजय अवसरमल (तालुका), विजय काशिनाथ अवसरमल, राहत खाटीक, शेख शरीफ यांच्यासह पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
Previous Post Next Post