घरगुती सामानाच्या नावावर सुरू असलेल्या तस्करीचा डाव उधळला; 90 लाखांचा माल जप्त...शहादा पोलिसांची धडाकेबाज कारवाई...

घरगुती सामानाच्या नावावर सुरू असलेल्या तस्करीचा डाव उधळला; 90 लाखांचा माल जप्त...
शहादा पोलिसांची धडाकेबाज कारवाई... 

(प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक )

शहादा :  मध्य प्रदेशातून गुजरातकडे जाणारा दारूचा महासाठा शहादा पोलिसांनी उधळून लावला आहे. प्रकाशा चौफुलीवर केलेल्या या धडक कारवाईत 65 लाख 29 हजार रुपयांची विदेशी दारू आणि 25 लाखाचा कंटेनर, असा एकूण 90 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहादा ते तळोदा मार्गावर सापळा रचण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी गस्तीवर असलेल्या पथकाला संशयित कंटेनर क्रमांक आरजी 32 जीसी 0812 आढळला. चालकाने घरगुती सामान असल्याची बतावणी केली, मात्र तपासणीत आत दारूचे खोके सापडले.
कंटेनर पोलीस ठाण्यात नेऊन केलेल्या सखोल तपासणीत विविध कंपन्यांची विदेशी दारू मोठ्या प्रमाणात आढळली. याप्रकरणी चालक व सहचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहायक निरीक्षक संदीप वाघ, चंद्रकांत देसले, हवालदार दीपक चौधरी, भगवान सावळे, कपिल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Previous Post Next Post