*पिंजर पोलिसांची मोठी कारवाई: 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत जुगार अड्ड्यावर धाड, १० जणांना अटक; २.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त*
(अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान)
पिंजर :अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध धंद्यांविरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत पिंजर पोलिसांनी धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवत भेंडगाव ते वडाळा रोडवरील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १० आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १९ जून रोजी करण्यात आली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम भेंडगाव ते वडाळा रोडवरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पिंजर पोलिसांनी पंचांसमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे तीन पानी परेल नावाचा जुगार खेळताना अरुण हरीभाऊ भगत, ज्ञानेश्वर निळकंठ भगत, सुनील भीमराव पाटील, जितेंद्र झिंगुजी मनवर, आनंद लक्ष्मण इंगोले, प्रफुल शालीग्राम जाधव, भारत पांडुरंग भगत, राहुल विठ्ठल मनवर, राजेंद्र वामन भगत आणि नागोराव गोमाजी तिडके (सर्व रा. भेंडगाव) या १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, छापऱ्यादरम्यान काही आरोपी शेत व जंगलाचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जुगाराचे साहित्य, मोटारसायकली आणि नगदी रोख रकमेसह एकूण २,१२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध पिंजर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नागसेन वानखडे करत आहेत.सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चीत चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. डी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुर्तीजापूर विभाग) श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन राठोड, पोउपनि अभिषेक नवघरे, पोहेकॉ नागसेन वानखडे, पोहवा प्रदीप धामने आणि पोकॉ विशालसिंग धनावत यांनी केली. अकोला पोलिसांची 'ऑपरेशन प्रहार' मोहीम यापुढेही अशीच अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

