यावल तालुक्यातील दत्त डेअरीत अन्न सुरक्षा विभागाची कारवाई
दूध,दही,पनीर,तूप व क्रीमचे नमुने तपासणीसाठी सीलबंद
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील)
यावल दि.१९ ) तालुक्यातील ऐतिहासिक फैजपूर शहरातील हनुमान मंदिर परिसरातील दत्त डेअरीत अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने आज शुक्रवार दि.१९ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक तपासणी मोहीम राबविली व डेअरीत दुधापासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे नमुने पुढील कार्यवाहीसाठी सिलबंद करून ताब्यात घेतले.यामुळे फैजपूर शहरात दुग्धजन्य पदार्थ वापरणाऱ्या सुज्ञ व आर्थिक संपन्न व सर्व सामान्य ग्राहकांमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठी खळबळ उडाली.
अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असून पथकाने तब्बल पाच तास डेअरीची तपासणी केली. दत्त डेअरीतील तपासणीदरम्यान दूध,दही,पनीर,तूप व क्रीम यांचे नमुने घेऊन ते सीलबंद करण्यात आले. संबंधित नमुने शासकीय प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच उत्पादनांमध्ये भेसळ आहे किंवा नाही याबाबत स्पष्टता होणार आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,तपासणी अहवालात भेसळ आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येऊ शकते.तसेच आवश्यकतेनुसार परवाना रद्द करण्याबाबतही शिफारस केली जाऊ शकते.तपासणी दरम्यान डेअरीतील स्वच्छता,दूध साठवणूक पद्धती तसेच विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पदार्थांची पाहणी करण्यात आली. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत निश्चित निकषांचे पालन होत आहे की नाही,याचीही खात्री करण्यात आली.
अन्न सुरक्षा विभाग राज्यभर भेसळविरोधी मोहिम राबवत असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
यावल तालुक्यात अनेक ठिकाणी देवी देवतांचे नावे देऊन दुग्धजन्य व इतर खाद्यपदार्थ विक्रीचे गोरख धंदे सर्रासपणे सुरू आहे.काही दूध संकलन करणाऱ्या व्यवसायिकांनी तर गावागावात प्रसिद्धी करून आपले उद्योग धंदे शहरात ठीक ठिकाणी सर्रासपणे सुरू करून अनेक दुग्धजन्य पदार्थ विक्री करीत आहे. ठिकठिकाणी असलेल्या दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात दूध संकलन नेमके कुठून आणि कोणत्या माध्यमातून केले जाते याबाबतची चौकशी झाल्यास भेसळीचे उद्योग समोर आल्याशिवाय राहणार नाही अशी सर्व स्तरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी बिना परवाना थंड पेय पॅकिंग करून अवैधरित्या ठिकठिकाणी विक्री होत आहे.
बनावट आरोग्यास हानिकारक विषारी पन्नीची दारू आणि तालुक्यात ताडीचे एक वृक्ष सुद्धा नसताना ताडीच्या नावाखाली बनावट ताडीची दारू विक्री अनेक ठिकाणी सुरू आहे.
गेल्या ३ दिवसापूर्वी ताडी विक्री करणाऱ्या विरुद्ध उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली परंतु दुसऱ्या दिवशी ते दुकान पूर्ववत सुरू झाले याला काय म्हणावे.? याबाबत दारूबंदी विभागाचे आयुक्त मुंडे साहेबांकडे लेखी तक्रार केली जाणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

