नागझिरी, फत्ते नगर आणि मौलाना आझाद नगरातील बालकांवर अन्याय; AIMIM चे प्रशासनाला निवेदन

नागझिरी, फत्ते नगर आणि मौलाना आझाद नगरातील बालकांवर अन्याय; AIMIM चे प्रशासनाला  निवेदन

महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक (रावेर /शेख शरीफ)

"बेटी बचाओ, बेटी पढाओ" आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाच्या योजनांना रावेर शहरातील काही मुस्लिम वस्त्यांमध्ये मात्र अद्याप वास्तवाचा स्पर्श झालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे. रावेर येथील नागझिरी, फत्ते नगर आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर या मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये आजपर्यंत स्वतंत्र अंगणवाडी केंद्र उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ए.आय.एम.आय.एम. रावेर युनिटच्या वतीने दिनांक २ जून २०२६ रोजी महिला व बालविकास अधिकारी, भुसावळ तसेच संबंधित विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर शेख कामिल शेख रऊफ, मुजाहिद खान उस्मान खान आणि शेख सुलतान शेख इसा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या वस्त्यांमध्ये लहान मुला-मुलींसाठी स्वतंत्र अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी बालकांना, गर्भवती महिलांना व स्तनदा मातांना दूरच्या अंगणवाड्यांमध्ये जावे लागत असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत त्या अपुऱ्या ठरत आहेत.
नवीन शासकीय धोरणानुसार जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नवीन अंगणवाडी इमारती मंजूर होऊ शकतात. त्यामुळे संबंधित मुस्लिम वस्त्यांसाठी स्वतंत्र अंगणवाडी इमारतींचा प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, "शहराच्या इतर भागात अंगणवाड्यांची सुविधा उपलब्ध असताना मुस्लिम वस्त्यांमधील बालकांना मूलभूत शैक्षणिक व पोषण सुविधांपासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या भागातील बालकांना न्याय द्यावा."
आता महिला व बालविकास विभाग आणि स्थानिक प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते, याकडे नागझिरी, फत्ते नगर आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
"बालकांच्या हक्कांवर अन्याय थांबवा; मुस्लिम वस्त्यांमध्ये तात्काळ अंगणवाड्या सुरू करा!"
— AIMIM रावेर युनिटची प्रशासनाकडे जोरदार मागणी
Previous Post Next Post