यमलोकातून परत येऊन केला जमिनीचा सौदा! नंदुरबारमधील 'भूत बंगला' व्यवहाराने प्रशासनाची लक्तरे वेशीवर...

यमलोकातून परत येऊन केला जमिनीचा सौदा! नंदुरबारमधील 'भूत बंगला' व्यवहाराने प्रशासनाची लक्तरे वेशीवर...

नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील

शहादा, दि. 17: माणूस मेल्यावर व्यवहार संपतात, पण नंदूरबार मध्ये  मृत्यूनंतर 2 वर्षे 1 महिन्यांनी शेतकरी थेट जमीन विकायला हजर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झालेले भोणे येथील गुंडा नागो ठेलारी यांनी 4 डिसेंबर 2024 रोजी नंदुरबारच्या दुय्यम निबंधक कार्यालयात 1 हेक्टर 61 आर जमिनीचे खरेदीखत केल्याची नोंद आहे. 
*कसा झाला बनावट व्यवहार?  
गुंडा ठेलारी यांच्या नावे मौजे दुधाळे येथे गट नं. 87/2/2/ब व 87/1/ब अशी एकूण 1.61 हेक्टर जमीन होती. शहरातील एका नामांकित बिल्डरने ठेलारी हयात असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे 4 डिसेंबर 2024 रोजी खरेदीखत नोंदवले. या जमिनीचे सरकारी मूल्यांकन 8.24 लाख रुपये आहे.
महसूल विभागाची संशयास्पद भूमिका  
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ठेलारी मयत झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांनी, जानेवारी 2023 मध्ये तहसिलदारांनी ही 'नवीन शर्ती'ची जमीन 'जुन्या शर्ती'त रूपांतरित करण्यासाठी नजराणा भरण्याचे पत्र दिले. त्यानुसार 17 फेब्रुवारी 2023 रोजी शर्ती बदलही झाला. मयताच्या नावाने शर्ती बदलाचा प्रस्ताव कोणी दिला, तो मंजूर कसा झाला, हे गूढ आहे. 5 गंभीर प्रश्न अनुत्तरित  
1.  दस्त नोंदणीवेळी बायोमेट्रिक आणि लाईव्ह फोटो व्हेरिफिकेशन कसे झाले?  
2.  नोंदणी अधिकाऱ्यांनी मृत्यू दाखला तपासला नाही का?  
3.  तलाठ्याने मयत व्यक्तीच्या नावाने फेरफार नोंद कशी घेतली?  
4.  नवीन शर्तीची जमीन परस्पर जुन्या शर्तीची कशी झाली?  
5.  नंदुरबार जिल्ह्यात असे आणखी किती व्यवहार झाले आहेत?
*पुढे काय?  
दुय्यम निबंधकांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर बिल्डरला 15 जून रोजी बोलावले होते, मात्र तो हजर राहिला नाही. आता 18 जून, बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणाने महसूल आणि नोंदणी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post