अवैध धंद्यांवर देगलूर पोलिसांची धडक कारवाई.
तीन जणांविरुद्ध गुन्हे; ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर : अवैध दारूविक्री व जुगार व्यवसायाविरोधात देगलूर पोलिसांनी बुधवारी (दि. ११) विशेष मोहीम राबवत तीन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ११ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन मासरेड' अंतर्गत देगलूर पोलिसांनी ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला. पहिल्या कारवाईत गंगाधर गंगाराम भोसले (वय ७५) यांच्याकडून ७५ लिटर शिंदी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या शिंदीची किंमत १ हजार ८७५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत नयुम शेख पि. मोईन शेख (वय ३६) हा सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत ५८० रुपये असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या कारवाईत मारोती गंगाराम कुदरे (वय ५०) याच्याकडे अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. विविध ब्रँडच्या देशी व विदेशी मद्याचा समावेश असलेल्या या मुद्देमालाची किंमत ८ हजार ६४० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणीही संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ११ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व जुगार व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया केल्या जात असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात पुढेही कठोर पावले उचलली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे, पोहेकों/२८२२ मोहन कनकवळे, पोहेकॉ/५२६ बालाजी पुरी, मपोहेकॉ / २६३८ शेख रिहाना, पोकों/३२१ गणेश बोदेमवाड, पोकॉ/३२११ अण्णाराव घुळे आणि पोकॉ/९७६ भालचंद्र ठाकूर यांनी महत्त्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. अवैध व्यवसायांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

