हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याच्या दर्जा द्या शासनाने तातडीने प्रस्ताव तयार करावा
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
हिंगणघाट : शहराचा ऐतिहासिक वारसा, औद्योगिक प्रगती, कृषी क्षेत्रातील योगदान आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेता हिंगणघाटला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यासाठी शासनाने तातडीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी सामाजिक चळवळीतील सहकारी व ग्रामराज्य सामाजिक ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन आमदार समीर कुणावार यांना देण्यात आले असून ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, विभागीय आयुक्त व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
निवेदनात हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे), वडनेर आणि अल्लीपूर या भागांचा समावेश असलेला नवीन जिल्हा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंगणघाट जिल्हा झाल्यास ग्रामीण भागाचा विकास, प्रशासनाची कार्यक्षमता आणि नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी इस्राईल पद्धतीची शेती, मसाला शेती आणि आयुर्वेदिक शेतीचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. हिंगणघाट हे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, कृषी उत्पन्न बाजार समिती, औद्योगिक विकास, शैक्षणिक संस्था, न्यायालये व उपजिल्हा रुग्णालय अशा सर्व सुविधा असलेले महत्त्वाचे शहर असल्याने स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची जनतेची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
शासनाने अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करून प्रथम अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करावे आणि त्यानंतर हिंगणघाटला स्वतंत्र जिल्हा घोषित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतेवेळी अनिल भोंगाडे, प्रज्योत लिहितकर, भास्कर शेंडे, मेघराज मून, हरीश ढगे आदी उपस्थित होते.

