थोरातांची फक्त फुगडीच की आणखी बरेच काही!
अहिल्या नगर जिल्हा विभागीय संपादक प्रशांत बाफना
जिल्हा बँकेत नव्या राजकीय समीकरणांची शक्यता । प्रा. राम शिंदे-खा. नीलेश लंके ही विखे विरोधी जोडी एकाकी पडणार?
सारिपाट / प्रशांत बाफना
काना, मात्रा, वेलांटी नसणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर झाल्यानंतर येथील राजकीय खलबतांचा गुंता देखील सरळ राहिला नसल्याचे सध्याच्या राजकीय समिकरणांमधून दिसून येत आहे. सहकारात कोणीच कोणाचा शत्रू राहत नसल्याचे यापूर्वी अनेकदा अधोरेखीत झाले. यावेळी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने अगदी तसेच होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांचे उजवा हात समजल्या जाणाऱ्या विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यांची बँक निवडणुकीत एंट्री होत आहे. त्यानिमित्ताने विखे विरोधकांची मोट बांधण्यासाठी ते सरसावलेत! खा. निलेश लंके यांना हाताशी धरुन त्यांनी याची सुरुवात केल्यानंतर पहिल्या घासालाच खडा लागण्यासारखी त्यांची अवस्था झाली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी राम शिंदे यांचे सुत जुळले असे वाटत असतानाच बँकेच्या हितासाठी थोरात- विखे हे पारंपारीक विरोधक एकत्र येण्याच्या चर्चा झडू लागल्या. दुसरीकडे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याशी विखे पिता- पुत्रांनी केलेली खलबते बरीच बोलकी ठरली आहेत. रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत फुगडी खेळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांची सहकारातील भूमिका वेगळी दिसल्यास आश्चर्य वाटू नये. विखे विरोधकांची मोट बांधून त्यांना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या राम शिंदे- निलेश लंके यांची जोडगोळी एकाकी पडण्याची शक्यता सध्यातरी निर्माण झाली आहे.
जयंती महम्मद पैगंबरांची अन् चर्चा डॉ. सुजय विखे पाटलांची!
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने विरोधी भूमिका घेतली होती आणि त्यातूनच सुजय विखे पाटलांचा पराभव झाला होता हे सर्वश्रूत! नुकत्याच झालेल्या महम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने सुजय विखे पाटील यांचे फलक नगर शहरासह जिल्हाभरात लावण्यात आले. त्यातून राजकीय चर्चांचे फड रंगणे स्वाभाविकच! मात्र, यावर बोलताना सुजय विखे पाटलांची अत्यंत मार्मिक भाषेत टिपणी केली. भाजपासोबत राहून हिंदुत्वाची भूमिका घेत असताना विखे परिवाराने कायम जातीय सलोखा जपण्याचे काम केले. नगर शहरात कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत विखे पाटलांचे सख्य! मुकुंदनगरमधील हत्याकांडानंतर आ. जगताप यांनी या समाजाच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. यानंतर काही दिवसात म्हणजेच दोन दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाच्या वतीने नगर शहरात महम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने शहराच्या अनेक भागात शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आणि त्या फलकांवर सुजय विखे पाटलांचे फोटोही झळकले. मागील वर्षीच्या याच जयंतीच्या निमित्ताने शहरात खा. निलेश लंके यांचे फोटो झळकले होते. यावेळी नेमके उलटे घडले. मुकुंदनगर हत्याकांडानंतर खा. लंके हे मुकुंदनगरमध्ये फीरकले देखील नाही. त्यातून या समाजाच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. सुजय विखे पाटलांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. यातून मुुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्ते आणि तरुण विखे पाटलांच्या भूमिकेने प्रभावीत झाले. त्यातूनच या तरुणांनी आणि मंडळांनी सुजय विखे पाटलांचे फोटो असणारे फ्लेक्स नगर शहरासह जिल्हाभरात लावले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, सुजय विखे पाटलांनी यावर माध्यमांशी बोलताना सावध प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या विरोधात मतदान केले. त्यावेळीही मी त्यांना त्याचा जाब विचारला नाही आणि आता त्यांनी माझे फोटो असणारे फ्लेक्स लावले असतील तर ती भूमिका आहे. तुम्ही (पत्रकारांनी) त्यांना याबाबत विचारा, असे उत्तर देऊन सुजय विखे पाटलांनी गुगली टाकली.
सभापती राम शिंदे यांची बँक एंट्री फिक्स; पण, विखेविरोधी भूमिकेची किंमतही मोजावी लागू शकते!
सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेसाठी दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. जामखेडमधून त्यांना आवश्यक असणारे ठराव त्यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांची बँकेतील संचालक म्हणून एंट्री फिक्स मानली जात असली तरी त्याच्या पुढे काहीही हाती लागण्याची शक्यता नाही. विखे विरोधकांची भेट घेऊन वातावरण तापविण्यापर्यंत त्यांनी कामगिरी केली. मात्र, आता निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना विखे पाटलांनी स्वकीयांसह विरोधकांची मोट बांधताना केलेल्या नाट्यमय हालचाली बोलक्या ठरल्या आहेत. कर्जत- जामखेड या दोन्ही तालुक्यात विखे पाटलांचे स्वत:चे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कायम किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. हे नेटवर्क मोडीत काढण्यासाठी राम शिंदे हे सरसावले आहेत. मात्र, त्यातून हे नेटवर्क अधिक चवताळून कामाला लागले तर त्याचे पडसाद उमटून त्याची किंमत राम शिंदे यांना मोजावी लागली तर आश्चर्य वाटू नये.
…म्हणून खा. लंके यांच्यासाठी जिल्हा बँक महत्त्वाचीच!
लोकसभेत दमदार एंट्री केल्यानंतर मी म्हणेल तेच अशा अविर्भावात खा. लंके यांचे विमान हवेत तरंगत होते. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्याला संधी देण्याऐवजी त्यांनी पत्नीला उमेदवारी देऊन घराणेशाही सुरु केली होती. मात्र, पारनेरकरांनी त्यांना नाकारले. यानंतर माजी आमदार विजय औटी यांना सोबत घेत त्यांनी बाजार समिती जिंकली. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सुजय विखे पाटलांनी त्यांना अस्मान दाखवले. यातून लंके यांच्या विरोधी मतदार आणि कार्यकर्त्यांची मोट विखे पाटलांनी बांधली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ताकद दाखवून द्यायची असेल आणि कार्यकर्त्यांचे खच्ची झालेेले मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खा. लंके यांनाच उतरावे लागणार. नुसते उतरुन चालणार नाही तर त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार! जर ते बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाले तर जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना उमेदवार देखील मिळणार नाहीत. त्यामुळेच खा. लंके यांनी ही निवडणुक कोणतीही महाशक्ती समोर आली तरी आपण जिंकणार असे जाहीरपणे सांगून टाकले आहे. खा. लंके यांनी निवडणूक लढविण्यासह जिंकण्याची दर्पोक्तीची भाषा केली असताना त्यांच्या विरोधकांमध्ये अद्यापही गटबाजीची खलबतेच शिजत आहेत.
एसपी साहेब, नगर शहरातील बिंगो-गुटखा माफिया सर्वश्रूत! मग, तुमची यंत्रणा करते तरी काय?
पत्रकार सुशिल थोरात यांच्यावर जिवघेणा हल्ला करणारी टोळी कोणाशी संबंधीत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अटक करण्यात आलेल्या या टोळीतील तिघांना पूर्वी अंकुश चत्तर याचा वरदहस्त होता. या तिघांनी पाईपलाईन रोडवरील एका चहाच्या टपरीवाल्याचा मुलगा पहिल्या मजल्यावरुन थेट खाली फेकून दिला होता. त्यातून त्याचा कंबरेतील मनका पूर्णपणे मोडला. आजही हा मुलगा जागेवर पडून आहे. आई-वडिल हतबल होऊन त्याची काळजी घेत आहेत. त्याच चहावाल्याच्या दुकानासमोर सुशिल थोरात या पत्रकारावर जीवघेणा हल्ला त्याच टोळीने केला. गुटखा- बिंगोच्या विरोधात बातमी छापल्याचा या टोळीला राग होता. एसपी साहेब, यातील आरोपींच्या मुसक्या आपल्या टीमने आवळल्या आणि आता त्यांना वाढीव कलम लावले हेही बरे झाले. त्यांच्यावर आता खटला चालेलही! मात्र, नगर शहरातील बिंगो कोण चालवते, त्याचा सुत्रधार कोण यासह रोज लाखोंचा गुटखा जप्त होत असतानाही नगर शहरात हा गुटखा खुलेआम विकला जातो. माव्याची उलाढाल काही लाखात रोजच होते. गुटखा- मावा आणि बिंगो या तिन्हींचे रॅकेट चालवणारा नगर शहरातील माफीया नगरकरांना माहिती असताना पोलिसांना माहिती नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एसपी साहेब, या व्हाईट कॉलर माफीयाला तुमचा स्वत:चा वरदहस्त नक्कीच नाही. मग, जर तुमचा वरदहस्त नाही आणि तुम्ही त्याचा चहा देखील पित नसाल तर त्याच्या मुसक्या का आवळल्या जात नाहीत! त्याच्यावर कोणाची मेहेरबानी आहे हे समजण्याची गरज आहे

