नबी-ए-करीम (स अ स) यांची सीरत संपूर्ण मानवजातीसाठी ‘रहमत’चा संदेश..
वहदत-ए-इस्लामी हिंदच्या ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम’ अभियानांतर्गत विशेष बैठकीत बिस्मिल्लाह शेख सर यांचे प्रतिपादन
(रावेर / शेख शरीफ महाराष्ट्र राज्य उपसंपादक)
वहदत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम’ या ११ दिवसीय जनजागृती अभियानाला रावेर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १६ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश पैगंबर हजरत मुहम्मद ( स अ स )यांच्या सीरत-ए-तैयबाच्या माध्यमातून रहमत, शांतता, प्रेम, न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि मानवतेच्या कल्याणाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा आहे.
आज समाजासमोर आत्महत्या, कन्या हत्या, व्यसनाधीनता, नैतिक मूल्यांची घसरण तसेच पर्यावरण व वायू प्रदूषणासारख्या गंभीर समस्या उभ्या आहेत. या समस्यांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासोबतच सीरत-ए-नबवी( स अ स)मधील शिकवणी समाजाला व्यावहारिक मार्गदर्शन म्हणून देण्याच्या उद्देशाने रावेर शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अभियानांतर्गत शहरातील विविध मशिदी, मदरसे, शैक्षणिक संस्था, रुग्णालये व सार्वजनिक ठिकाणी कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. तसेच घराघरात संपर्क साधून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. विविध माध्यमांतून ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम’चा संदेश मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी शहरातील मान्यवरांच्या विशेष बैठकीला संबोधित करताना बिस्मिल्लाह शेख सर यांनी सांगितले की, अल्लाहने मानवासह सृष्टीतील प्रत्येक गोष्टीची निर्मिती एका विशिष्ट नैसर्गिक व्यवस्थेनुसार केली आहे. मनुष्याने नैसर्गिक व नैतिक मूल्यांनुसार जीवन जगल्यास त्याचे जीवन स्वतःसह इतरांसाठीही उपयुक्त ठरते. मात्र, निसर्ग व नैतिक मूल्यांशी छेडछाड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम समाजासमोर येतात.
ते म्हणाले की, मानवाला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अल्लाहने वेगवेगळ्या काळात अनेक पैगंबरांना पाठविले. त्यांनी केवळ एकेश्वरवादाचा संदेश दिला नाही, तर आपल्या काळातील सामाजिक व नैतिक समस्यांवरही मार्गदर्शन केले. हजरत शुऐब अलैहिस्सलाम यांनी माप-तोलात फसवणूक करण्यास मनाई केली, हजरत हूद अलैहिस्सलाम यांनी अनावश्यक दिखावा व अहंकारापासून दूर राहण्याचा संदेश दिला, तर हजरत लूत अलैहिस्सलाम यांनी आपल्या समाजातील गंभीर नैतिक विकृतींविरोधात जनजागृती केली.
आज संपूर्ण मानवजात विविध गंभीर संकटांनी वेढलेली असून, या समस्यांवर नैतिक, सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून मार्गदर्शन सीरत-ए-नबवी (स अ स)मध्ये मिळते, असे बिस्मिल्लाह शेख सर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपले जीवन पैगंबर हजरत मुहम्मद (स अ स) यांच्या आदर्शांनुसार घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या जीवनातील दया, न्याय, बंधुभाव, शांतता आणि मानवतेच्या कल्याणाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.
रबीउल अव्वल महिन्याच्या निमित्ताने वहदत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने हा संदेश केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण समाज आणि देशवासीयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज फरहान यांच्या कुरआन पठणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौसीफ अहमद यांनी केले. यावेळी शहरातील विविध मान्यवर व्यक्तींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

