*माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष**
(भामलवाडी तालुका रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव)
पुरी गोलवाडे : देशभक्तीचा जागर, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि तिरंग्याच्या साक्षीने माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालय परिसरात सकाळपासूनच देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सतीश श्रीराम पाटील, निंबोल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण प्रभात फेरी काढली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत, नृत्य, नाटिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल पाटील सर यांनी केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास, त्याग आणि बलिदान यांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांचा आदर्श घेत ज्ञान, शिस्त आणि संस्कारांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष अण्णासो मनोज कुमार पाटील सर व सचिव आदरणीय माईसाहेब यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचे कौतुक करत सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील सर यांनी प्रभावी व ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालक व ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती आणि संपूर्ण परिसरात निर्माण झालेले देशभक्तीचे वातावरण यामुळे माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडेचा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

