शिक्षणातून यश,यशातून समाजसेवा ! समस्त सूर्यवंशी बारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा.
मोबाईल आणि सोशल नेटवर्कच्या आहारी न जाता अभ्यासाकडे लक्ष द्या; यशस्वी झाल्यावर समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात द्या — आमदार अमोल जावळे.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल, दि. ३०
आजच्या स्पर्धेच्या आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य व मर्यादित वापर करून शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगचा अनावश्यक वापर कमी करून अभ्यास, वाचन, ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेळ दिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येते. मात्र, केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न राहता, यशस्वी झाल्यानंतर आपल्या समाजातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे हीदेखील प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले.
यावल शहरातील भुसावळ टी-पॉइंट परिसरातील सुमाई मंगल कार्यालयात समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतुर्ली येथील प्राचार्य बाळू बारी होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल जावळे यांच्यासह नगरपालिकेच्या भाजप गटनेत्या नंदाताई महाजन,नगरसेविका वैशाली बारी,डॉ.रमेश बारी,डॉ.नितीन बारी,बाळकृष्ण खलसे,तुकाराम खलसे,शिवाजी पाटील,बबीता बारी,रमेश बारी,अशोक अस्वार, नामदेव अस्वार,पवन पाटील, प्रकाश खलसे,नगरसेवक सागर चौधरी, योगेश चौधरी, उमेश फेगडे, बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईलचा वापर ज्ञानासाठी व्हावा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार जावळे म्हणाले की, मोबाईल हे आधुनिक युगातील प्रभावी साधन आहे. मात्र, त्याचा वापर कशासाठी आणि किती प्रमाणात करतो, यावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. मोबाईलमधील कॅमेरा आणि कॅल्क्युलेटरच्या वापराची तुलना केल्यास अनेकदा कॅमेऱ्याचा वापर अधिक होत असल्याचे दिसून येते. ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार करण्यास भाग पाडणारी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञान, संशोधन, अभ्यास आणि कौशल्यविकासासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजाच्या ऋणाची जाणीव ठेवा
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम समाज करीत असतो. समाजाने दिलेले हे प्रोत्साहन विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरते. त्यामुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर क्षेत्रात मोठे यश संपादन केल्यानंतर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी विसरता कामा नये.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी यशस्वी युवकांनी पुढे येणे काळाची गरज आहे. एका विद्यार्थ्याला मदत केल्यास केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलण्याची ताकद शिक्षणात असल्याचेही आमदार जावळे यांनी नमूद केले.
गुणवंतांचा झाला गौरव
या सोहळ्यात विविध परीक्षांमध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी गणपत मोहन अस्वार आणि विलास वसंत खलसे यांनी विशेष चषक उपलब्ध करून दिले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी दर्शन राजेंद्र पाटील यांनी प्रमाणपत्रे तयार करून दिली होती.
शिक्षणासोबत सामाजिक जाणीवेची पेरणी
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ पुरस्कार देण्याचा कार्यक्रम नसून, नव्या पिढीच्या मनात शिक्षणाची आवड, स्पर्धेची प्रेरणा आणि समाजाबद्दलची कृतज्ञता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत आणि आपल्या यशाचा लाभ समाजातील इतर गरजू घटकांनाही मिळवून द्यावा, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अशोक बारी आणि संगीता परमानंद बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणीचे अध्यक्ष निलेश नागपुरे, विलास मुरलीधर काटोले, राजेंद्र काळे तसेच माजी नगरसेवक सुनील वासुदेव खलसे-बारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षणातून व्यक्ती घडते, व्यक्तीतून समाज घडतो आणि सुसंस्कृत समाजातून राष्ट्राची प्रगती होते; याच विचाराला बळ देणारा हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावल शहरात प्रेरणादायी ठरला.

