**भर रस्त्यात मृत्यूचा सापळा! निंबोल ते ऐनपूर रोडवरील खड्ड्यामुळे विद्यार्थी अन् प्रवाशांचा जीव टांगणीला **
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे रावेर)
ऐनपूर : रावेर तालुक्यातील निंबोल ते ऐनपूर रस्ता सध्या वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. शनी मंदिर व सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व जुनियर कॉलेज च्या अगदी जवळच, भर रस्त्यात एक अतिशय मोठा आणि खोल खड्डा पडला आहे. हा खड्डा आता ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि हजारो शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. *विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर* महाविद्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या मार्गावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. अनेक विद्यार्थी सायकल किंवा दुचाकीने प्रवास करतात. निंबोल ते ऐनपुर या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अचानक वाहने घसरून विद्यार्थी जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. *पावसाळ्यात वाढला धोका* सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पाऊस सुरू असताना दुचाकीस्वार थेट या खड्ड्यात आदळत आहेत. यामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. *नागरिकांमधून संताप, तात्काळ दुरुस्तीची मागणी*
"संबंधित प्रशासनाने या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे," असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एखादा मोठा आणि जीवघेणा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि पालकांनी उपस्थित केला आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यानची तात्काळ डागडुजी करावी, अशी तीव्र मागणी ऐनपूर परिसर आणि रावेर तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.

